बालासोर : कुणाचा हात राहिला नाही, तर कुणाचे पाय… कुणाच्या डोळ्याला मार लागला, तर कुणाचं डोकं फुटलं… प्रत्येकाच्या शरीरावर जखमा… प्रत्येकाच्या शरीरावर रक्त… अस्तव्यवस्त पडलेलं सामान… माणसंही अस्तव्यस्त पडलेली… ओडिशा येथील रेल्वे अपघातानंतरची ही दृश्य आहेत. अपघाताच्या फोटोतून अपघाताची भीषणता दिसून येते. कुणी बाप गमावलाय, कुणी नवरा तर कुणी मुलगा… हे चित्रं पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येतंय… रडारड सुरूच आहे… रुग्णालयात तर आक्रोश आणि मातम आहे.
ओडिशा येथे बालासोर जवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झालाय. या अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 50 रुग्णवाहिका कमी पडल्या. त्यामुळे बसेस मागवण्याची दुर्देवी वेळ प्रशासनावर आलीय. काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तीन ट्रेनने एकमेकांना धडक दिली अन् होत्याचं नव्हतं झालं. कालपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. उजाडलं तरीही रेक्स्यू ऑपरेशन सुरूच होतं. रेक्स्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांच्या डोळ्याला डोळा लागलेला नाहीये. अपघाताची भीषणताच तेवढी होती.
मी कोरोमंडल एक्सप्रेसच्या बोगी नंबर पाचमध्ये होतो. जेव्हा अपघात झाला तेव्हा झोपेत होतो. ट्रेन पटरीवरून खाली उतरली तेव्हा हलल्यासारखं झालं आणि माझा डोळा उघडला. माझ्या अंगावर 10 ते 15 लोक पडलेले होते. मी या लोकांच्या खाली दबलो गेलो. कशातरी पद्धतीने मी डब्यातून बाहेर आलो. बाहेर येताच भयावह दृश्य पाहून मला भोवळच आली. जे काही समोर पाहिलं ते डेंजर होतं. शब्दात सांगणंही कठिण आहे. ना कुणाचे हात होते, ना कुणाचे पाय… जिकडे तिकडे रक्ताने माखलेली शरीर… आताही ते चित्र आठवताना कसं तरी होतं, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
S5 बोगीतील प्रवाशांना फारसं काही लागलं नाही. त्यांना किरकोळ मार लागला. त्यांचे जीव थोडक्यात बचावले. आम्ही चेन्नईला जात होतो. मी पेंटर आहे. माझ्या सीटच्या खाली एक दोन वर्षाचा मुलगा होता. तो पूर्णपणे सुरक्षित आहे. एका व्यक्तीने माझ्या कुटुंबीयांना वाचवलं, असं दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं.
या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 233 मृतदेह काढण्यात आले आहेत. तर 900 जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अपघाताची पाहणी करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री बालासोरला येत आहेत. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सुद्धा घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.