जयपूर : कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन या विषाणूचा प्रसार आता महाराष्ट्रानंतर राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये एकूण 9 जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. येथील आरोग्य विभागाने याची पुष्टी केलीय. या नऊ जणांपैकी चार रुग्ण एकाच कुटुंबातील असून बाकीचे पाच बाधित जयपूरमधील आदर्श नगरातील रहिवाशी आहेत. हे सर्व बाधित दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
राजस्थानधील आरोग्य विभागाचे सचिव वैभव गलरीया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओमिक्रॉनबाधित नऊ जणांच्या लाळेचे नमुने जिनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या नऊ नव्या रुग्णांव्यतिरिक्त आज महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांत सात नवे ओमिक्रॉनग्रस्त आढळले. या सर्व रुग्णांना मिळून आता देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा 21 वर पोहोचला आहे.
देशात पहिला रुग्ण कर्नाटकमध्ये आढळला होता. त्यानंतर त्याचा प्रसार गुजरातमध्येदेखील झाल्याचे समोर आले. राजधानी दिल्लीमध्येदेखील ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातदेखील आठ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये आता राजस्थानमधील नऊ रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात डोंबिवलीनंतर पुण्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात एक तर पिंपरी-चिंचवडमध्ये सहा अशा एकूण सात रुग्णांची पुणे जिल्ह्यात नोंद करण्यात आलीय. या सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. पिंपरी चिंचवडमधील सहा रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. तरीदेखील खबरदारी म्हणून त्यांना क्वॉरन्टाईन करण्या आलंय. तसेच त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत.
इतर बातम्या :