उदयपूर: देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवणारी एक बातमी समोर आली आहे. राजस्थानात एका वृद्धाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे या रुग्णाने कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते. तसेच या रुग्णाचे कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, उदयपूर येथे राहणाऱ्या एका 75 वर्षीय वृद्धाचं ओमिक्रॉनमुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर उदयपूरच्या महाराणा भूपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा एक दिवस आधीच रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 15 डिसेंबर रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या वृद्धाची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची ताप, खोकला आणि रायनाइटिसची टेस्ट करण्यात आली होती. त्यात तो कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. 15 डिसेंबर रोजी ही टेस्ट करण्यात आली होती. 21 डिसेंबर रोजी पुन्हा त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. तीही निगेटिव्ह आली होती. मात्र, 25 डिसेंबर रोजी जीनोम सीक्वेसिंगचा रिपोर्ट आल्यावर त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
दरम्यान, महाराष्ट्रातील पिंपरीचिंचवडमध्येही एकाचा ओमिक्रॉनने मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा 28 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली होती असा अहवाल काल आला होता.
पिंपरी-चिंचवडमध्ये काल ओमिक्रॉनचे 3 नवे रुग्ण आढळून आले होते. या तीन रुग्णांपैकी दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या तीन रुग्णांपैकी एकजण नायजेरियातून आलेला आहे. अन्य दोघे ते त्या रुग्णाचे निकटवर्तीय आहेत. यातील नायजेरियातून आलेल्या रुग्णाचा 28 डिसेंबरला वायसीएम रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्या रुग्णाचा तपासणी अहवाल काल प्राप्त झाल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर उर्वरित दोन नवे रुग्ण हे भुसावळमध्ये उपचारासाठी दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.
संबंधित बातम्या: