मुंबई : कोरोना विषाणूचा (Corona Virus) नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचं (Omicron) नवं संकट जगासमोर उभं राहिलं आहे. अशावेळी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरियंटनं कहर केलाय. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 93 हजार 45 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 111 कोरोनाबळी गेलेत. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत भयावह अशी वाढ होत आहे.
>> बुधवारी 78 हजार 610 नवे कोरोनाबाधित
>> गुरुवारी 88 हजार 376 नवीन करोना रुग्णांची भर
>> शुक्रवारी 93 हजार 45 कोरोनाबाधित
>> आठवडाभरात तब्बल 4 लाख 77 हजार 229 कोरोना रुग्ण
ओमिक्रॉननं लंडन आणि स्कॉटलँडमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटलाही मागे सोडलंय. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा पाच पट अधिक आहे. लंडनमध्ये तर तब्बल 80 टक्के रग्ण ओमिक्रॉनमुळे बाधित झाल्याचं आढळून आलं आहे. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी प्रभावी असल्याचे कोणतेच पुरावे नाहीत, ब्रिटिश संशोधकांच्या दावानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे युरोपात आता अजून कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे एकूण 14 हजार 909 रुग्ण आढळले आहेत. तर 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनबाधित असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव डेल्टापेक्षा वेगानं होत असल्यानं रुग्णालायत ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढू लागलीय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ओमिक्रॉन संसर्गाचे रुग्ण 38.6 टक्के इतके आढळून येतायेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यास लस 0 ते 30 टक्के प्रभावी आहे, तर बुस्टर डोसनंतर लस 55 ते 80 टक्के प्रभावी असल्याचा दावा ब्रिटनच्या तज्ज्ञांनी केलाय.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच जर्मनीही कोरोनाच्या पाचव्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी लशीच्या बुस्टर डोसची मोहिम राबवण्यात येतेय. युरोपात कोरोनानं दाणादाण उडवली असताना तिकडे अमेरिकेतही कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या देशातील नागरिकांना ओमिक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. लस न घेतल्यास हिवाळ्यात कोरोनामुळे मृत्यूही ओढावू शकतो, असा इशारा बायडेन यांनी दिलाय.
कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं न्यूयॉर्कमधील कॉलेज बंद करण्यात येत आहेत. कॉरनेल विद्यापीठात तब्बल 700 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर विद्यापीठ परिसल सील करण्यात आलाय. तसेच विद्यापीठाची अंतिम परीक्षाही ऑनलाईनच घेतली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 17 वर्षे वयोगटातील सर्वांनाच बूस्टर डोस देण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग आणि ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे कोरोना चाचणी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यानं कॅनडानं त्यांच्या नागरिकांना गरज नसेल तर आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका पर्यटन उद्योगाला बसला आहे. इटली आणि बोत्सवानामध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. इटलीच्या जीडीपीमध्ये पर्यटन व्यवसायाचा 5 टक्के वाटा आहे. दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियामध्ये कोरोनाची लाट सुरू आहे. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय. दरवर्षी बोलिव्हियामध्ये 12 लाख पर्यटक येत असतात पण कोरोनामुळे यावर्षी फक्त 30 हजार पर्यटक आल्यानं मोठं आर्थिक संकट ओढावलंय.
चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बफर झोनची निर्मिती करण्यात आलीय. सीमेवरील भागात स्थानिक प्रशासनाला कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आलेत.
ओमिक्रॉननं आतापर्यंत तब्बल 89 देशांत शिरकाव केलाय. सामुहिक संसर्ग झालेल्या देशात अवघ्या दीड ते तीन दिवसात ओमिक्रॉनचा संसर्ग दुप्पटीनं फैलावत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था बळकट आणि गर्दी टाळण्याचं आवाहन WHO नं केलंय.
भारतातही ओमिक्रॉनबाधिताची संख्या शंभरपेक्षा जास्त झालीय. केरळ आणि महाराष्ट्रासह इतर 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास भारतातही ब्रिटनसारखं कोरोनाचा विस्फोट होण्याची भिती आहे. ब्रिटनप्रमाणेच भारतात कोरोनाचा कहर झाल्यास दररोज तब्बल 14 लाख कोरोनाबाधित आढळून येतील, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही. के. पॉल यांनी दिलाय. त्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर मास्क लावा, लस घ्या आणि सामाजिक अंतराचे पालन करणं गरजेचं आहे.
इतर बातम्या :