Omicrone BF7 : चीनमध्ये निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाचा भडका पाहायला मिळतोय. चीनसह आणखी 5 देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसने चिंता वाढवल्या आहेत. ज्यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट (Coronavirus New Variant) आता भारतात देखील चिंता वाढवत आहे. याबाबत आता केंद्र सरकारने देखील अलर्ट जारी केला असून येत्या काही दिवसात नवी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.
आरोग्य मंत्रालय (Health Ministry) यावर नजर ठेवून आहे. त्यामुळे परिस्थिती योग्यपणे हाताळण्यासाठी केंद्राने सर्व राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांनी आज एक आढावा बैठक घेतली.
चीनमध्ये ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट बीएफ.7 (Omicron Sub-variant BF.7) कहर करत आहे. याचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. चीनमध्ये अनेकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणं कठीण झाले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील रांगा लागल्या आहेत. या सर्व परिस्थितीनंतर भारत देखील अलर्ट झाला आहे.
बीएफ.7 चा धोका किती?
कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने जगभरात चिंता वाढवल्या आहेत. कारण हा व्हायरस झपाट्याने चीनमध्ये लोकांना ससंर्ग करत आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बीएफ.7 चा संसर्ग दर हा इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक आहे. या व्हेरिएंटची लक्षण दिसण्याचा कालावधी कमी आहे. लस घेतल्यानंतर ही तो लोकांना संक्रमित करत आहे. तो कोरोना विरुद्ध तयार झालेल्या इम्युनिटीला देखील छेद देऊ शकतो. बीएफ.7 मुळे एक व्यक्ती 10 ते 18 लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो.
भारतातील लोकांना चिंता करण्याचं कारण नाही. कारण भारतात अशी परिस्थिती उद्भवणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. भारतात बहुतांश लोकांचे लसीकरण झाल्याने भारतात याचा धोका कमी असल्याचं म्हटलं आहे. पण तरी देखील सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ही 3 लक्षणं दिसताच व्हा अलर्ट
ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट बीएफ.7 (Omicron Sub-variant BF.7) काही लक्षणं आहेत. ज्यामध्ये अंग दुखणे, ताप, गळ्यात इन्फेक्शन यांचा समावेश आहे.
वातावरण बदलत असल्याने अनेकांना ताप, सर्दी अशा समस्यांचा सामना करावा लागतोय. पण तरी जर तुम्हाला ३ दिवसापेक्षा जास्त ताप असेल तर लगेच कोरोनाची चाचणी केली पाहिजे. ज्या लोकांना आधीच कोणते गंभीर आजार आहेत. त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. लहान मुलं, वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांनी देखील अधिक काळजी घेण्याची गरज आहे.