बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी तीन जणांना गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला आज अटक केली आहे. हरियाणातील कैथल येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय अमितला पोलिसांनी अटक केलीये. याप्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणाचा रहिवासी गुरमेल सिंग आणि उत्तर प्रदेशचा रहिवासी धर्मराज कश्यप हे दोन शूटर देखील अटकेत आहेत. तर तिसरा शूटर शिवकुमार गौतम हा खुनाच्या कटात सहभागी असलेल्या इतर काही लोकांसह फरार झाला आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात गोळ्या झाडण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
मुंबईतील नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या तीन हल्लेखोरांनी हत्या करण्यापूर्वी रायगडमध्ये एका धबधब्याजवळ गोळीबाराचा सराव केला होता असं ही समोर आलंय. पोलीस अधिकाऱ्यांनी खुलासा केलाय की, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत असे स्पष्ट झाले की अटक करण्यात आलेले हल्लेखोर धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि फरार शिवकुमार गौतम यांनी सप्टेंबरमध्ये मुंबईच्या बाहेरील कर्जत तहसील अंतर्गत पळसदरी येथील धबधब्याजवळ गोळीबाराचा सराव केला होता. धबधब्याजवळ एक निर्जन जागा पाहून त्यांनी गोळीबाराचा सराव केला होता.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमागचं कारण अजून समोर येऊ शकलेलं नाही. बाबा सिद्दिकी यांना का मारण्यात आलं याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. पण याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. पण तरी देखील पोलीस वेगवेगळ्या अँगलने याचा तपास सुरु केलाय. या हत्येमागे कोणाचा हात आहे. खरा सूत्रधार कोण याचा शोध सुरु आहे. आज ११ व्या आरोपीने अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यानंतर पोलीस त्याची कस्टडी मागून याचा पुढील तपास करतील.