नवी दिल्ली : एकीकडे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत एनडीएमध्ये ( NDA ) सहभागी झाल्यानंतर आता आणखी एक पक्षाने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर चिराग पासवान हे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी पोहोचले. या दोघांच्या भेटीनंतर त्यांनी आपला लोक जनशक्ती पक्षाचा एनडीएमध्ये समावेश केला. जेपी नड्डा यांनी त्यांचं एनडीएमध्ये स्वागत केलं.
चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये येण्यापूर्वी आपल्या काही मागण्या भाजपसमोर ठेवल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला 6 जागा आणि राज्यसभेची एक जागा मिळावी, अशी त्यांची मागणी होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एलजेपीला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे चिराग पासवान यांनी सर्व 6 लोकसभा जागांवर दावा केला आहे. पण भाजपने त्यांच्या अटी मान्य केल्या आहेत की नाही हे अजून समोर आलेले नाही. मात्र आता चिराग पासवान यांचा पक्ष एनडीएचा भाग असून १८ जुलै रोजी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत.
2021 मध्ये लोक जनशक्ती पक्षात फूट पडली आणि त्यानंतर एनडीएमध्ये सामील झालेले चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर पशुपती पारस केंद्रात मंत्री झाले. दुसरीकडे चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) स्थापन करण्यात आली. चिराग पासवान यांना वगळता लोक जनशक्ती पक्षाचे सर्व खासदार पशुपती पारस हे पशुपती पारस यांच्यासोबत गेले होते.
चिराग पासवान आणि काका पशुपती पारस यांना एकत्र करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना त्यात यश आलेले नाही. अलीकडेच नित्यानंद राय यांनी पाटण्यात चिराग पासवान आणि नंतर दिल्लीत पशुपती पारस यांची भेट घेतली होती, मात्र असे असूनही काका-पुतण्यामध्ये युद्ध सुरूच आहे.
चिराग पासवान यांनी त्यांचे वडील दिवंगत रामविलास पासवान यांच्या पारंपरिक हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, जिथून पशुपती पारस सध्या खासदार आहेत. पण पशुपती पारस यांनी देखील याच जागेवरुन निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. पण आता उद्या होत असलेल्या एनडीएच्या बैठकीला हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे त्यांचं या ठिकाणी मनोमिलन होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.