सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. भाजीपाल्यापासून खाद्यपदार्थापर्यंत सर्व काही फोनवर बुक करुन घरी मागवले जाते. पंजाबमधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबाने दहा वर्षीय मुलीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑनलाईन केकची ऑर्डर दिली. परंतु केक खाल्यानंतर कुटुंबातील सर्वांना त्रास होऊ लागला. कुटुंबातील सदस्यांना उलट्या सुरु झाल्या. ‘बर्थ डे गर्ल’ असलेली दहा वर्षीय मानवी हिलाही उलट्या सुरु झाल्या. तिचे शरीर थंड पडले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. मानवी बाबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ तिच्या आजोबांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पंजाबमधील पटियाला येथील अमन नगर येथे राहणारे काजल यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी म्हटले की, २४ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता ऑनलाईन केक मागवला. ६.३० वाजता केक घरी आला. केक खाल्यानंतर मानवीसह परिवारातील अन्य कुटुंबाची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. मानवी आणि तिच्या लहान बहिणीला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचार सुरु असताना मानवीचा मृत्यू झाला. तिच्या लहान बहिणेचे प्राण वाचले. कुटुंबातील चार सदस्यांची प्रकृती बिघडली होती.
The grandfather of the 10-year-old girl who died after eating cake on her birthday briefed about the whole incident. #patiala pic.twitter.com/g1oLk6Okbo
— Gagandeep Singh (@Gagan4344) March 30, 2024
अजोबा हरबंस यांनी सोशल मीडियावर घटनेची माहिती दिली. मानवी पाचवीत शिक्षण घेत होती. ती वर्गात मॉनिटर होती. झोमॅटोवरुन केक मागवला होता. त्यानंतर केक खाल्यानंतर सर्वांना त्रास सुरु झाला. या घटनेत नातीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोग्य विभागाने काहीच कारवाई केली नाही.
यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हरबंस यांनी केली आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी सुरिंदर सिंग यांनी म्हटले की, घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. केक आलेल्या ठिकाणावर जाऊन तपास करण्यात येणार आहे.