चंदीगड: ऑपरेशन ब्ल्यू स्टारला (Operation Blue Star) आज 38 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने पंजाबमधील वातावरण बिघडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाहेर (Golden Temple) खालिस्तान समर्थकांनी आज घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली जात आहे. या मंदिराबाहेर शेकडो खालिस्तानी समर्थक एकवटले. त्यांनी जोरजोरात खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा (Pro-Khalistan Slogans) दिल्या. यावेळी खालिस्तांनी समर्थकांनी जर्नल भिंडरावाले यांचे फोटोही उंचावले. काहींच्या हातात तर भिंडरावालेंचा फोटो असलेली पोस्टरही होते. काही खालिस्तानी समर्थकांनी हातातील तलवारीही नाचवल्या. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुवर्ण मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी जमलेला जमाव अधिक आणि पोलीस कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सकाळीच सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हजारोच्या संख्येने खालिस्तानी समर्थक उपस्थित होते. अचानक झालेल्या या गर्दीमुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. हातात तलवारी आणि भिंडरावालेंचे पोस्टर घेऊन हे खालिस्तानी समर्थक जोरजोरात घोषणा देत होते. यात तरुणांचा सर्वाधिक समावेश होता. तसेच खालिस्तानी समर्थकांची ही घोषणाबाजी पाहण्यासाठी यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
#WATCH | Punjab: A group of people gathers at the entrance to the Golden Temple in Amritsar, raises pro-Khalistan slogans and carries posters of Khalistani separatist Jarnail Bhindranwale. pic.twitter.com/zTu9ro7934
— ANI (@ANI) June 6, 2022
दरम्यान, ऑपरेशन ब्ल्यू स्टारला 38 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कालच सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर अकाल तख्तचे प्रमुख ज्ञानी हरप्रीत सिंग यांच्या सोबत बंद दाराआड चर्चा केली. दर्शनानंतर ते थेट सिंग यांच्या घरी गेले. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधण्यास नकार दिला. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था भंग केली जाणार नाही. पोलिसांना हाय अॅलर्टवर ठेवण्यात आलं आहे, असं मान यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यानंतरही आज हजारो लोकांनी सुवर्ण मंदिरात येऊन दर्शन घेतलं.
3 जून रोजी गुरू अर्जुन देव यांचा शहीद दिन होता. त्यामुळे 2 जून रोजी 1984 हर मंदिर साहेब परिसरात हजारो भाविक जमले होते. त्याच दरम्यान इंदिरा गांधी यांनी देशाला संबोधित करत खलिस्तानी चळवळ आणि पंजाबमधील हिंसेकडे सरकार अत्यंत गंभीरपणे पाहत असून कठोर कारवाईचा निर्णय घेऊ शकते हे स्पष्ट झालं होतं. नंतर केंद्र सरकारने पंजाबकडून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्यांची सेवा बंद केली होती. फोनचे कनेक्शन कट करण्यात आले होते. परदेशातील पत्रकारांनाही पंजाबमधून बाहेर काढण्यात आलं होतं. सुवर्ण मंदिराचं वीज-पाणी कापण्यात आलं होतं. त्यामुळे नेमकं काय घडणार याचा अंदाज येत होता.
त्यानंतर 3 जून 1984 रोजी लष्कराने अमृतसरमध्ये जाऊन सुवर्ण मंदिराला घेराव घातला. लष्करी कारवाई आधी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 4 जून रोजी लष्कराने गोळीबार सुरू केला. सुवर्ण मंदिरात लपलेल्या कट्टरतावाद्यांकडील शस्त्रांचा अंदाज घेण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. कट्टरतावाद्यांनीही गोळीबाराला जशास तसे उत्तर दिलं. 5 जून रोजी अखेरीस लष्कराने शस्त्र सज्ज गाड्या आणि टँकांचा वापर केला. 5 जूनच्या रात्री कट्टरतावादी आणि लष्करा दरम्यान प्रचंड गोळीबार झाला. मंदिरात 6 जून 1984ला व्यापक अभियान राबवलं गेलं. या ऑपरेशन दरम्यान भिंडरावालाचा मृतदेह मिळवण्यात सैन्याला यश आलं. 7 जून 1984 रोजी सैन्याने मंदिरावर ताबा मिळवला. मात्र लष्कर मंदिरात घुसल्याने शीख समुदायात प्रचंड रोष निर्माण झाला होता. 1 जून ते 10 जूनपर्यंत ऑपरेशन ब्लू स्टार सुरू होतं.