गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था वेगा्ने ढासळत चालली आहे. जबरदस्तीने वसुली केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी हाणामाऱ्यांच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असून सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत, असं विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांनी राज्यातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेची उदाहरणंही दिली आहेत.
गोव्यातील मोर्मुगावात भाजपचे आमदार संकल्प अमोणकर यांच्यावर धमकावल्याचा आणि जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. त्यात अमोणकर हे एका व्यावसायिकाला जबरदस्ती करत असल्याचं ऐकू येत आहे. बैना बीचवर एका वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटरला व्यवसाय चालवण्यासाठी अमोणकर हे कथितरित्या एक लाख रुपयांची भरपाई मागत आहेत. ही बातचीत सुरू असताना धमकावल्याचा आवाजही ऐकायला येत आहे. अमोणकर हे कथितपणे या ऑपरेटरला त्याचा व्यवसाय बंद करण्याची धमकी देत असून काही दिवसातच पैसे भरण्यासाठी दम देत असल्याचं दिसत आहे. मात्र, ही क्लिप अमोणकर यांचीच आहे याची अजून कोणतीही पुष्टी झालेली नाही.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. भयाचं वातावरण निर्माण झालं आहे. व्यवसाय करावा की करू नये? अशी भीती या लोकांमध्ये निर्माण झाली आहे. संकल्प अमोणकर यांचे मुख्यमंत्र्यांसोबत अत्यतं घनिष्ट संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दुसरी एक अशीच घटना उघड झाली आहे. भाजपचे दक्षिण गोव्याचे जिल्हा अध्यक्ष तुलसीदास नायक यांच्याशी ती संबंधित आहे. संकोले एमआरएफ कचरा संयंत्रमध्ये एका व्यक्तीने नायक यांना कथितपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे कॉर्टालिमचे अपक्ष आमदार एंटोन वाज आणि स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला आहे. त्यांनी या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यावर गोव्यात काय चाललंय काय? असा सवाल गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
Mr @goacm @DrPramodPSawant & @DGP_Goa what is happening in Goa ? Goonda Raj under the @BJP4India regime is now operating in day light in Goa at Sancoale in presence of Cortalim Independent MLA Anton Vaz supporting the @BJP4Goa Govt and Police Officers remain spectators while… pic.twitter.com/2kkAIHBfJ4
— Amit Patkar (@amitspatkar) September 5, 2024
याप्रकरणांवरून गोव्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी ट्विट करून टीका केली आहे. एक व्यक्ती जाहीरपणे तुलसीदास नायक यांना मारहाण करण्याची धमकी देत आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. सरकारचं या गोष्टींवर नियंत्रण राहिलेलं नाही. त्यामुळे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाहीये. आता तर भाजपचे कार्यकर्तेही राज्यात सुरक्षित नाहीये, असा दावा अमित पाटकर यांनी केला आहे.
पोलिसांच्या उपस्थितीत या घटना घडत आहे. साक्षीदार असतानाही पोलीस आणि सरकार मूकदर्शक बनलेली आहे. काहीच कारवाई केली जात नाही. सरकारने कठोर निर्णय घ्यावेत. राज्यातील दहशतीचं वातावरण दूर करण्यासाठी गुन्हेगारांना कडक शासन करावं, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.