राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मणिपूरचा मुद्द्यावर ही लक्ष केंद्रीत केले. गेल्या एक वर्षापासून मणिपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. अजूनही अजून मधून हिंसक घटना घडत आहेत. या संपूर्ण वादावर आता पीएम मोदींनी राज्यसभेत आपले मत मांडले आहे. मोदी म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 11 हजारांहून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले असून, 500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, मणिपूरमध्ये आता हिंसाचाराच्या घटना सातत्याने कमी होत आहेत, हे देखील मान्य करावे लागेल. विरोधकांनी आगीत इंधन भरले आहे, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लगावला आहे.
आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी सरकारने काय पाऊले उचलली याची देखील माहिती दिली. ते म्हणाले की, याआधी मणिपूरमध्ये एखादा मंत्री अनेक दिवस थांबला असं झाले नसेल. पण आता गृहराज्यमंत्री आठवड्या भरापासून मणिपूरमध्ये आहेत. ते साततत्याने अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ती पावले उचलली जात आहेत. मणिपूरच्या मुद्द्यावर सध्या राजकारण करणाऱ्या विरोधकांना मणिपूरची जनता पूर्णपणे नाकारेल, असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलेय.
आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी मणिपूरच्या हिंसक इतिहासाबद्दलही तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की, असे संघर्ष याआधीही पाहायला मिळालेत. हे काय फक्त एका टर्ममध्ये झालेले नाही. ज्यांना मणिपूरचा इतिहास माहित आहे त्यांना हे देखील माहित आहे की येथे हिंसाचाराचा वेगळा संघर्ष झाला आहे. संघर्षाचा पाया हा खूप खोल आहे. त्यामुळेच मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, हे काँग्रेसने विसरू नये.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मणिपूरबाबत आज पंतप्रधानांनी जे सांगितले ते वास्तवापेक्षा वेगळे आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी (मणिपूरमध्ये) 2/3 पेक्षा जास्त मते जिंकली. त्यानंतर मणिपूर जळू लागला. हे अंतर्गत रचले गेलेले षडयंत्र आहे. पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरला भेट दिली नाही. आजच्या आधी ते एक शब्दही बोलले नाहीत.
जयराम रमेश पुढे म्हणाले की, आज त्यांना बोलणे भाग होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात देखील मणिपूरचा फारसा उल्लेख नव्हता. मणिपूरचे खासदार बिमोल अकोइझम यांनीही मणिपूरचा उल्लेख केला नाही. हा कोणता दांभिकपणा आहे? जेव्हा विरोधकांनी सभात्याग केला तेव्हा पंतप्रधानांनी मणिपूरबद्दल बोलले. त्यांनी सांगितलेली गोष्ट वास्तवापेक्षा वेगळे आहे. आजही मणिपूरचे लोक विचारत आहेत की पंतप्रधान मणिपूरला का येत नाहीत.