संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. लोकसभेच्या सभागृहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे भाजप देशाला एका चक्रव्यूहात अडकवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच या चक्रव्यूहात सहा जण केंद्रभागी आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी यावेळी जी सहा नावे घेतली, त्यामुळे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडून जोरदार गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खूप प्रयत्न करुन सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यानंतर सभागृहात शांतता पसरली आणि राहुल गांधी यांनी आपलं भाषण पुन्हा सुरु केलं.
महाभारतात अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये फसवून मारलं गेलं होतं. या घटनेचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “चक्रव्यूहमध्ये भीती, हिंसा असते, अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये फसवत 6 लोकांनी मारलं. चक्रव्यूहाचं दुसरं नावही आहे ते म्हणजे पद्मव्यूह म्हणजेच लोटस फॉरमेशन. यामधलं चक्रव्यूह हे कमळाच्या आकाराचं असतं. 21 व्या दशकात एक नवं चक्रव्यूह तयार झालंय. ते चक्रव्यूह सुद्धा कमळायच्या आकाराचं आहे. त्याचं चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या छातीवर लावून चालतात”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
“जे अभिमन्यसोबत केलं गेलं, ज्याप्रकारे अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवण्यात आलं होतं तेच आता भारतासोबत केलं जात आहे. भारताच्या तरुणांसोबत, महिलांसोबत, लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगपती यांच्यासोबत तेच केलं गेलंय. अभिमन्यूला सहा लोकांनी मारलं होतं. आजही चक्रव्यूहमध्ये 6 लोकं आहेत. चक्रव्यूहच्या केंद्रभागी 6 लोकं कंट्रोल करत आहेत. या चक्रव्यूहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्योगपती अदानी आणि अंबानी हे कंट्रोल करत आहेत”, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
यानंतर सभागृहात सत्ताधारी खासदारांकडून जोरदार गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच जी लोकं सभागृहाची सदस्य नाहीत त्यांची नावे घेऊ नका, असं ओम बिर्ला म्हणाले. त्यावर राहुल गांधी यांनी आपली इच्छा असेल तर मी हे तीन नावं काढून टाकतो, असं म्हटलं.
“दोन लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. देशाच्या अर्थसंकल्पाने तरुणांना काय दिलं? या बजेटद्वारे एकाही मुलाला रोजगार मिळाला नाही. इंटर्नशिप प्रोगॅम आहे, पण ती एक थट्टा आहे. कारण तुम्ही सांगितली की, इंटर्नशिप ही देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये होईल. पण आधी तरुणांचे पाय तोडले आणि नंतर त्यावर बँडेज लावत आहात. तुम्ही तरुणांना एकीकडे पेपरलीक, तर दुसरीकडे बेरोजगारीच्या चक्रव्यूहात फसवलं आहे. गेल्या 10 वर्षांत 70 वेळा पेपर लीक झाला. बजेटमध्ये पेपरलीकबद्दल काही म्हटलं गेलं नाही. तसेच शिक्षण विभागासाठी बजेटमध्ये फार काही तरतूद करण्यात आली नाही. दुसरीकडे तुम्ही भारतीय सैन्याच्या जवानांना अग्निवीरच्या चक्रव्यूहात अडकवलं आहे. अग्निविरांच्या पेन्शनसाठी बजेटमध्ये एक रुपया नाही”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.