Weather Update in maharashtra: देशभरात मान्सून सक्रीय झाला आहे. परंतु काही राज्यांमध्ये पाऊस नाही तर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेश, आसम आणि मेघालयात 4 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, सिक्किम, नगालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये 05 जुलैपर्यंत तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात 6 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्याला आँरेज अलर्ट बुधवारी दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारी पाऊस सुरु आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात चांदोली धरण परिसरामध्ये गेले दोन दिवस अतिवृष्टीचा पाऊस होत आहे. त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 675 क्युसेक्सने पाणी सोडले आहे. तसेच या परिसरामध्ये पाऊस चालू असल्याने वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. नदीचे पात्र बाहेर पडत आहे. तर कोकरूड ते रेठरे बंधारावर पाणी येऊ लागले आहे. तर काही छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदी तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात 105 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल 90 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे. आज अखेर 700 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. सध्या धरणात 6 हजार 982 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे तर अतिवृष्टीमुळे परिसरातील ओढे- नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
नांदेड जिल्ह्यात पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीच संकट उभे टाकले होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता. मात्र नांदेडमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने पिकाला जीवनदान मिळाले आहे. जिल्ह्यात 67 टक्के इतक्या पेरण्या झालेल्या आहेत. काही भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी अद्यापही पेरणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे.