कोट्यवधींचा फ्लॅट, इमारतीच्या 20व्या मजल्यावरून पडून अब्जाधीशाच्या वडिलाचा मृत्यू; OYO च्या संस्थापकाच्या घरी नेमके काय घडलं?

| Updated on: Mar 11, 2023 | 10:24 AM

अत्यंत दु:खद अंतकरणाने सांगावंसं वाटतं की, आमचे मार्गदर्शक, आमचे शक्तीस्त्रोत, माझे वडील रमेश अग्रवाल यांचं 10 मार्च रोजी निधन झालं. ते आपलं संपूर्ण आयुष्य भरभरून जगले. प्रत्येक दिवस ते आम्हाला प्रेरित करायचे.

कोट्यवधींचा फ्लॅट, इमारतीच्या 20व्या मजल्यावरून पडून अब्जाधीशाच्या वडिलाचा मृत्यू; OYO च्या संस्थापकाच्या घरी नेमके काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. गुरुग्राम येथील गगनचुंबी इमारतीत अग्रवाल कुटुंब राहत होतं. रमेश अग्रवाल यांचा याच इमारतीच्या 20 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. रितेश अग्रवाल यांनीही त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. रमेश अग्रवाल यांच्या निधनामुळे उद्योगजगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पोलिसांनीही या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची सूत्रांची माहिती आहे.

गुरुग्राम पोलिसांना रात्री एक वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. त्यावेळी रमेश अग्रवाल यांचा मृत्यू 20 व्या मजल्यावरून पडून झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. अग्रवाल कुटुंब डीएलएफ क्रिस्ट सोसायटीत राहत होते. रमेश अग्रवाल हे त्यांच्या घराच्या बाल्कनीत आले होते. त्यावेळी त्यांचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तेव्हा घरात सर्वच होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा अग्रवाल कुटुंबातील सर्वच जण घरात होते. अग्रवाल यांचा मुलगा रितेश, सून आणि पत्नीही घरातच होती. 7 मार्च रोजीच रितेश अग्रवाल यांचं गितांशा यांच्याशी विवाह झाला होता. लग्नाच्या तीन दिवसानंतरच ही दुर्घटना घडल्याने लग्नाच्या घरातील वातावरण आता शोकाकुल झालं आहे.

रितेश अग्रवाल काय म्हणाले?

या संदर्भात रितेश अग्रवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अत्यंत दु:खद अंतकरणाने सांगावंसं वाटतं की, आमचे मार्गदर्शक, आमचे शक्तीस्त्रोत, माझे वडील रमेश अग्रवाल यांचं 10 मार्च रोजी निधन झालं. ते आपलं संपूर्ण आयुष्य भरभरून जगले. प्रत्येक दिवस ते आम्हाला प्रेरित करायचे. त्यांचा मृत्यू आमच्या कुटुंबासाठी मोठी हानी आहे. त्यांचे शब्द आमच्या काळजात नेहमीच कोरले जातील, असं रितेश अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

हॉटेल चेनचे मालक

ओयो रुम्स ही वेगाने वाढणारी जगातील सर्वात मोठी हॉटेल चेन आहे. या कंपनीचे तब्बल 35 देशांमध्ये 1.5 लाख हॉटेल्स आहेत. ग्राहकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वस्तात बुकिंगची सुविधा या हॉटेलकडून दिली जाते.