इस्लामाबाद : भारत गेल्या दहा वर्षात इतका वेगाने प्रगती करतोय की अनेक विकसित देशांना देखील भारताचे सामर्थ्य मान्य करावे लागले आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तान भारताशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात असतो. पण तो आता बराच मागे पडला आहे. असं असताना देखील दक्षिण आशियात पाणबुड्यांचे सर्वात मोठे सैन्य तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरु होता. पण त्याला आता मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान आर्थिक आव्हानामध्ये अडकला आहे. चीनने हँगोर श्रेणीच्या डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांचे बांधकाम पुढे ढकलले आहे. हँगोर प्रकल्पांतर्गत पाकिस्तानच्या नौदलाला पहिल्या चार पाणबुड्या 2023 च्या अखेरीस मिळणार होत्या. पण एकही पानबुडी मिळाली नाही. पाकिस्तानी नौदलाने सैन्यात 8 पाणबुड्यांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. जेणेकरून त्यांना अरबी समुद्रात भारताच्या आव्हानांना तोंड देता येईल.
सध्या पाकिस्तानी नौदलाकडे पाच डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्या आहेत. ज्या फ्रेंच आणि चिनी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की पाकिस्तान नौदलाला हँगोर वर्गाची पहिली पाणबुडी मिळालेली नाही. पुरवठादार आणि प्राप्तकर्ता देश चीन आणि पाकिस्तानमधील वाढत्या आर्थिक आव्हानांमुळे प्रकल्पाला विलंब होत आहे, असे अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या संरक्षण उत्पादन मंत्रालयाने (MoDP) चीनकडून AIP तंत्रज्ञानाने सुसज्ज आठ पाणबुड्या खरेदी करण्यास मान्यता दिली होती. या प्रकल्पांतर्गत कराची शिपयार्ड अँड इंजिनिअरिंग वर्क्स (KSEW), पाकिस्तान येथे चार पाणबुड्या बांधण्यात येणार होत्या. तर उर्वरित चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशन येथे बांधण्यात येणार आहे. पहिल्या चार पाणबुड्या 2023 पर्यंत आणि शेवटच्या चार (KSEW कडून) 2028 पर्यंत वितरित केल्या जाणार होत्या.
हँगोर पाणबुड्या या चीनी युआन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित S-26 प्रकार आहेत. हे विशेषतः निर्यातीसाठी विकसित केले गेले आहेत. स्टँडर्ड-ग्रेड S-26 मध्ये अनेक डिझाइन बदल करण्यात आले आहेत. हँगोर क्लास पाणबुडी S26 च्या 2,550 टनांच्या तुलनेत 2,800 टन विस्थापनासह मोठी आहे. परंतु त्याची हुल थोडीशी लहान आहे (S26 साठी 77.7 मीटरच्या तुलनेत 76 मीटर). दोन्हीमध्ये सहा टॉर्पेडो ट्यूब आणि स्टर्लिंग-आधारित AIP प्रणालीची समान पेलोड क्षमता आहे.
आधी S-26 पाणबुड्या जर्मन MTU 12V 396 SE84 डिझेल इंजिनद्वारे समर्थित होत्या, परंतु जर्मन सरकारने पॉवरप्लांटसाठी निर्यात परवाना रोखून ठेवला होता. नंतर, पाकिस्तान नौदलाने ही पाणबुडी चीनी CHD-620 डिझेल इंजिनसह तयार करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे कार्यक्रमास विलंब झाला. विलंब इंजिनच्या बदलामुळे झाला आहे किंवा शक्यता आहे की पाकिस्तान आर्थिक अडचणीत असल्याने विलंब झाला असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तान नौदलाच्या ताफ्यात सर्व 8 हँगोर श्रेणीच्या पाणबुड्यांचा समावेश केल्यानंतर, एआयपी सुसज्ज पाणबुड्यांची संख्या 11 होईल. मात्र, त्यानंतर पाकिस्तानी नौदलाकडे असलेल्या पाणबुड्यांची एकूण संख्या १३ होईल.