नवी दिल्ली : प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे अचानक सूर बदलू लागले आहेत. तिने सुरुवातीला पाकिस्तानवर टीका केली होती. पाकिस्तानात महिला सुरक्षित नाहीत, मी तिथे जाणार नाही असं सीमा हैदर म्हणाली होती. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि देशात सीमा हैदरची चर्चा आहे. आपल्या चार मुलांसह सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. सीमा हैदरला टेक्नोलॉजीच असलेलं ज्ञान आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व लक्षात घेऊन ती हेर असल्याच बोललं जात होतं.
या संबंधात तिची यूपी ATS कडून चौकशी सुद्धा झाली. सध्या ती प्रियकर सचिन मीणासोबत नोएडा येथे वास्तव्याला आहे. सीमा हैदरने जी माहिती दिली होती, त्यात बरीच विसंगती आढळल्याने तिची पोलीस चौकशी झाली.
सीमाचे सूर का बदलले?
सध्या ती जामिनावर बाहेर आहे. अंजू प्रेम प्रकरणामुळे सीमा हैदरची मागच्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा थंडावली होती. पण आता पुन्हा सीमा हैदरची चर्चा सुरु झाली. सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवलं जाऊ शकतं. त्यामुळे तिचे सूर आता बदलू लागले आहेत. पाकिस्तानात महिलांची स्थिती चांगली आहे, असं ती बोलू लागली आहे.
सीमाने आधी काय म्हटलं होतं?
“पाकिस्तानच्या शहरात मुलींना स्वातंत्र्य आहे. त्या फिरु शकतात, फॅशनेबल कपडे परिधान करु शकतात. पण मी जिथून आलीय, तिथे आजही महिलांना वाईट वागणूक दिली जाते” असं सीमा हैदरने म्हटलय. आधी सीमाने म्हटलं होतं की, “संपूर्ण पाकिस्तानात महिलांना चांगली वागणूक दिली जात नाही. महिला तिथे बंधनामध्ये असतात. या उलट भारतात महिलांना स्वातंत्र्य आहे. पुरुषांप्रमाणेच त्यांची वाटचाल सुरु आहे”
सीमाच्या मनात नेमकं काय आहे?
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, सीमाला आता असं वाटतय की, भविष्यात तिला पाकिस्तानात पाठवलं जाईल. म्हणून ती जाणूनबुजून पाकिस्तानातील लोकांबद्दल चांगलं बोलत आहे. सीमाला खरंतर भारतात रहायचय. कारण पाकिस्तानात गेल्यावर काय होईल, याची तिला कल्पना आहे. पण ती त्याचवेळी खूप विचारपूर्वक पाकिस्तानबद्दल टिप्पणी करतेय.
सचिनच्या नातेवाईकांची चौकशी होणार?
सचिनने सीमासोबत लग्न केलं, त्याबद्दल सचिनच्या बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या आत्याला, तिच्या मुलांना आणि नातेवाईकांना कल्पना होती. सीमा सचिनच्या आत्याच्या मुलांच्या संपर्कात होती. सुरक्षा यंत्रणा आता सचिनच्या नातेवाईकांची चौकशी करु शकतात. ट्रॅव्हल एजंटला पैसे पाठवणे आणि नेपाळमधल्या वास्तव्यासंदर्भात चौकशी होऊ शकते.