संदीप राजगोळकर, नवी दिल्ली, 14 डिसेंबर | संसदेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यास बुधवारी १३ डिसेंबर रोजी २२ वर्ष पूर्ण झाली. त्याच दिवशी पुन्हा संसदेची सुरक्षा भंग करुन हल्ला करण्यात आला. आता हल्ला करणारे युवक सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी घुसले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सहावा आरोपी फरार आहे. लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणारा आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा आहे. तसेच संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे चौघेही आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. एक ते दीड वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी फेकबुकवर भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला होता.
संशयित आरोपीपैकी 4 जण 1 ते दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर एकमेकांना भेटले. त्यांनी भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून ते एकामेकांच्या संपर्कात राहत होते. त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. या प्रकरणात पाचवा आरोपी विकी शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. पण सहावा आरोपी ललित झा अजूनही फरार आहे. मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे हे 3 दिवसांपूर्वी दिल्लीत आले. वेगवेगळ्या वेळेत ते दिल्लीत दाखल झाले.
मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांनी केंद्र सरकारने मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन, महागाई याबाबत घेतलेली भूमिका पटली नाही. यामुळे त्यांनी संसदेत घुसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांची चौकशी करणाऱ्या यंत्रणेकडून देण्यात आली.
संसद हल्ल्यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीसी कलम 452, 120-B आणि UAPA यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.