संदीप राजगोळकर, नवी दिल्ली 14 डिसेंबर | बुधवारी झालेल्या संसद हल्ल्यातील सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमधील काही जण उच्चशिक्षित आहेत. हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले होते. त्यांनी भगतसिंग फॅन क्लब तयार केला होता. त्यानंतर दीड वर्षांपूर्वी म्हैसूरमध्ये एकत्र आले. पुन्हा नऊ महिन्यांनी भेटले. त्यावेळी संसदेत घुसखोरी करुन अराजकता पसरवण्याचा कट रचला. त्यासाठी मार्च महिन्यात त्यांनी रेकी केली. मग सागर शर्मा, मनोरंजन, अमोल शिंदे, नीलम आणि ललित झा मंगळवारी रात्री गुरुग्राममध्ये विशाल शर्मा याच्या घरी थांबले. या प्रकरणाचा मास्टरमाइंड ललित झा आहे. तो संसदेच्या बाहेर अमोल शिंदे आणि नीलमचा व्हिडिओ बनवत होता. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रॅमवर अपलोड केला. तसेच सर्व आरोपींचे मोबाईल त्याच्याकडे आहे.
अमोल शिंदे आणि नीलम यांनी संसदेच्या बाहेर गोंधळ सुरु केला. त्यावेळी ललित झा हा त्यांचा व्हिडिओ बनवत होतो. सिग्नल अॅपच्या माध्यमातून हे एकामेकांच्या संपर्कात होते. गोंधळ सुरु होताच ललित सर्वांचे मोबाईल घेऊन फरार झाला. ललितकडे नीलम, अमोल, सागर आणि मनोरंजनचे मोबाईल फोन आहे. पोलीस ललितचा आणि इतर आरोपींच्या मोबाईलचा शोध घेत आहे.
मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान मनोरंजन बंगळूर येथून नवी दिल्लीत आला. व्हिजिटर पास घेऊन संसदेत गेला. त्यावेळी त्याने रेकी केली. त्यावेळी बुटांची तपासणी केली जात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. १० डिसेंबर रोजी सर्व आरोपी आपआपल्या राज्यातून दिल्लीत आले. मनोरंजन विमानाने दिल्लीत पोहचला.
अमोल शिंदे लातूरवरुन दिल्लीत आला. घरी सैन्य भरतीसाठी जात असल्याचे त्याने सांगितले. रंगीत स्मोक क्रॅकर घेऊन अमोल शिंदे आला होता. सागर शर्मा 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता महादेव रोड येथे गेला. त्याने खासदार प्रताप सिम्हा याच्या पीएकडून पास कलेक्ट केला. मग सर्व आरोपी इंडिया गेटवर भेटले. या सर्वांना अमोल शिंदे याने रंगीत क्रॅकर दिले. सागर शर्मा आणि मनोरंजन 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता संसद भवनात दाखल झाले.