पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला. मोदी 3.0 सरकारचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. अधिवेनाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना सोबत घेऊन जनतेसाठी काम करण्याचा संकल्प केला. परंतु मोदी 3.0 सरकारमध्ये मजबूत झालेल्या विरोधकांनी पहिल्याच दिवशी मोदी सरकारला झटका दिला. संसद अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात विरोधकांनी पहिला मोठा विरोध केला. हंगामी अध्यक्षाच्या पॅनेलवर विरोधकांनी बहिष्कार घातला. इंडिया आघाडीच्या तीनही सदस्यांनी हंगामी अध्यक्षाच्या (प्रोटेम स्पीकर) पॅनेलवर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू यांनी पॅनेलवर बहिष्कार टाकला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी के. सुरेश, सुदीप बंदोपाध्याय आणि टीआर बालू या तिघांनाही प्रोटेम स्पीकरच्या पॅनलमध्ये नियुक्त केले होते. परंतु या तिघांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलचे तीन सदस्य प्रोटेम स्पीकरला मदत करणार नाहीत. ते नवीन खासदारांना शपथ देणार नाहीत. हे पॅनल फक्त नवीन खासदारांना शपथविधी पुरता तयार केले आहे. लोकसभा अध्यक्ष निवडीनंतर पुन्हा नवीन पॅनल बनवले जाईल.
संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी हातात संविधान घेऊन इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केले. सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, तालिकाध्यक्ष राधामोहन सिंह यांनी खासदार पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी शपथ घेत असताना सभागृहात भाजप खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. महाष्ट्रातील पाच मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ हे आज शपथ घेणार आहेत. तसेच गोवाल पाडवी, शोभा बच्छाव, स्मिता वाघ, अनुप धोत्रे, बळवंत वानखेडे, अमर काळे, श्यामकुमार बर्वे, प्रशांत पडोळे, नामदेव किरसान, प्रतिभा धानोरकर, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, वसंतराव चव्हाण, संजय जाधव हे खासदार आज शपथ घेणार आहेत.