नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. थोड्याच वेळात अधिवेशन सुरु होईल. संसदेत जाण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेचं अधिवेशन का घेतलं जात आहे? याचं कारण दिलं आहे. तसेच संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी छोटा असला तरी या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार आहे. खासदाराने संसदेच्या कामकाजात भाग घ्यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
संसदेचं अधिवेशन नव्या ठिकाणी होणार आहे. नव्या ठिकाणी जातानाच भारताला 2047 पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे. हे अधिवेशन अनेक प्रकारे महत्त्वाचं आहे. सर्व खासदारांनी या विशेष अधिवेशनातील कामकाजात जास्तीत जास्त भाग घ्यावा असं आग्रह मी खासदारांना करत आहे. जीवनात काही क्षण असे येतात की ज्यामुळे उत्साह वाढतो. त्यामुळे आता सर्व वाईट गोष्टी सोडून आपण चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत जाऊया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
चंद्रावर तिरंगा फडकत आहे. तिथलं शिवशक्ती पॉईंट हा आपल्या प्रेरणेचं केंद्र आहे. जी-20 परिषदही यशस्वी पार पडली. अनेक संधी आणि शक्यता आपल्यासमोर निर्माण झाल्या आहेत. भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनला आहे. देशात उत्साहाचा वातावरण आहे. संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी भलेही छोटा असेल. पण काळाच्या हिशोबाने अधिक मोठा आहे. 75 वर्षाचा हा प्रवास आता नव्या मुक्कामातून सुरू होत आहे. हे ऐतिहासिक निर्णयाचं अधिवेशन असेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
भारताच्या प्रयत्नामुळे आफ्रिकन संघ जी-20चा स्थायी सदस्य बनला. भारताला या गोष्टीचा नेहमीच अभिमान राहील. या सर्व गोष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत आहेत. कालच एक आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र यशोभूमीही देशाला समर्पित करण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी आजच्या संसद अधिवेशनाबाबतचं महत्त्वाचं ट्विट केलं आहे. लोकसभेचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे 13 वं अधिवेशन असेल आणि महत्त्वाचं अधिवेशन आहे. या अधिवेशनात गौरवशाली लोकशाहीच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन आपण नव्या संसदेत जाणार आहोत. नवी ऊर्जा आणि आत्मविश्वासाने लोकशाहीला अधिक समृद्ध करण्यासाठी या नव्या यात्रेला सुरुवात होईल, असं ओम बिरला यांनी म्हटलं आहे.