मुंबई : सध्या देशात एकच चर्चा आहे, चांद्रयान 3 ची. शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं. देशातील कोट्यावधी लोक आपल्या घरातून, शाळेतून, कार्यलायतून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण होता. लोक अजूनही सोशल मीडियावर या प्रक्षेपण सोहळ्याशी संबंधित फोटो, व्हिडिओ पोस्ट करत आहेत. चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाचा असाच एक खास व्हिडिओ समोर आलाय.
वैज्ञानिकांनी इस्रोच्या कार्यालयातून तर सर्वसामान्य जनतेने टीव्हीवरुन चांद्रयान 3 च लॉन्च पाहिलं. पण काही लोकांनी विमानातून चांद्रयान 3 चा हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
‘याची देही याची डोळा’ हे लॉन्च पाहिलं
चांद्रयान 3 च प्रक्षेपण झालं, त्याचवेळी चेन्नईहून ढाक्याला विमान चाललं होतं. त्यावेळी वैमानिकाने विमानातील प्रवाशांना या ऐतिहासिक क्षणाची माहिती दिली. प्रवाशांनी विमानातून ‘याची देही याची डोळा’ हे लॉन्च पाहिलं. काहींनी हा ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमऱ्यात कैद केला.
किती लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला?
हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही तासातच लाखो लोकांनी पाहिला. आतापर्यंत 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा आकडा वाढतच जाणार आहे. 21 हजारपेक्षा जास्त लाइक्स या व्हिडिओला आहेत. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चांद्रयान 3 ची कक्षा विस्तारली
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने LVM-3 या रॉकेटद्वारे चांद्रयान 3 च यशस्वी प्रक्षेपण केलं. लॉन्चनंतर काही मिनिटात चांद्रयान 3 ला अत्यंत अचूक अपेक्षित कक्षेत स्थापित केलं. चांद्रयान 3 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु आहे. शनिवारी चांद्रयान 3 ची कक्षा आणखी वाढवण्यात आली. म्हणजे पृथ्वीपासून अजून लांब नेण्यात आलं.
Launch of Chandrayan 3 from flight. Sometime after takeoff from Chennai to Dhaka flight, pilot announced to watch this historical event pic.twitter.com/Kpf39iciRD
— Dr. P V Venkitakrishnan (@DrPVVenkitakri1) July 15, 2023
31 जुलैपर्यंत चांद्रयान 3 वर काय प्रयोग होणार?
31 जुलैपर्यंत टप्याटप्याने चांद्रयान 3 ची कक्षा विस्तारण्यात येणार आहे. 1 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चा चंद्रावर लँडिंगचा अंतिम प्रवास सुरु होईल. चांद्रयान 3 च यशस्वी लँडिंग झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरेल.