Vande Bharat Express: भारतीय रेल्वेची सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतची लोकप्रियता चांगली वाढली आहे. जलदगतीने आरामदाय प्रवास होत असल्यामुळे वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु या ट्रेनचा घातपात करण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला आहे. वंदे भारत ट्रेनवर अनेक ठिकाणी दगडफेक झाली आहे. आता गुरुवारी उदयपूर-आग्र वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला. या ट्रेनच्या मार्गावर लोखंडाचा तुकाडा पटरीवर (टायबार फेसिंग) ठेवण्यात आला होता. परंतु चालकाला ही बाब लक्षात येताच त्याने एमरजन्सी ब्रेक लावत गाडी थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
उदयपूर-आग्रा वंदे भारत एक्सप्रेस (20981) कोटा रेल मंडळाच्या बुंदी आणि तालेडा स्टेशन दरम्यान जात होती. त्यामुळे रेल्वे पटारीवर लोखंडाचा तुकडा ठेवण्यात आला. हा तुकडा टायबार फेसिंग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वंदे भारत रेल्वे पटरीवरुन घसरवण्याचा हा कट होता. रेल्वेच्या गार्डने तो लोखंडाचा तुकडा आपल्यासोबत नेला. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
कोटा रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सौरभ जैन यांनी सांगितले की, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीनंतर हे सर्व प्रकरण स्पष्ट होणार आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडाचा तुकडा हा टायबार फेंसिंगचा आहे. तो रेल्वे स्टेशन किंवा कॉलनीजवळ फेसिंगसाठी वापरण्यात येतो. मग हा लोखंडाचा तुकडा त्या ठिकाणी कसा पोहचला? हा मोठा प्रश्न आहे. कारण त्या ठिकाणी जवळपास स्टेशन नाही किंवा रेल्वे कॉलनीसुद्धा नाही. हा कोणी कट रचला आहे की चुकून केला गेला आहे. हे अजून स्पष्ट झाले नाही.
काही दिवसांपूर्वी कोटा-बिना रेल्वे ट्रॅकवर छाब्राजवळ मोटारसायकलचा भंगार रेल्वे पटरीवर सोडण्यात आला होता. त्यामुळे मालगाडीचा अपघात झाला होता. याप्रकरणी आरोपी 37 वर्षीय गजराज कंजर याला चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.