नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, मोदी सरकारची नियत सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मोदींच्या निर्णयावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला. मोदी सरकार अध्यादेश का आणत नाही? निवडणुका लागल्यावरच अध्यादेश काढणार का? असा सवालही प्रियंका यांनी केला.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या मागण्याही केल्या. शेतकऱ्यांना अटक केली जात होती. त्यांची हत्या केली जात होती. त्यांना मारहाण केली जात होती. तुमचचं सरकार हा अन्याय करत होतं. आज मात्र तुम्ही म्हणता कायदे मागे घेतो. मग तुमच्यावर आम्ही विश्वास कसा विश्वास ठेवायचा? तुमच्या नियतीवर विश्वास कसा ठेवायचा?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.
शेतकरी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना मी भेटले. त्यांचं दु:ख मी समजू शकते. सरकार गंभीर आहे तर त्यांनी लखीमपूर खेरीबाबत योग्य कार्यवाही करावी. केंद्रीय मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या देशात शेतकऱ्यांसोबत सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. ते कर्जात बुडाले आहेत. काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्या गोष्टी आंदोलन करत आहेत. त्याची दखल घ्यावी. ते प्रश्न सोडावावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, गुंडे, देशद्रोही आणि दहशतवादी कोण म्हणालं होतं? तुमचेच नेते हे बोलत होते ना? त्यावेळी तुम्ही काय करत होता. तेव्हा मोदी गप्प का होते? मोदींनीच शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवलं होतं, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठं नाही हे उशिरा का होईना पण सरकारला कळलं आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी उभे ठाकतात आणि सत्ताधाऱ्यांना झुकावच लागतं हे सरकारला कळलं आहे. याचा मला आनंद आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक एकवटले याचाही आनंद आहे, असंही त्या म्हणाल्या.
मोदी एकदाही बॉर्डवर गेले नाहीत. शेतकऱ्यांना भेटले नाहीत. हिंसा झाली, हत्या झाली त्या ठिकाणीही ते कधी गेले नाही. त्यांनी कधी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत. मग आज अचानक त्यांना कशी काय जाग आली? स्पष्ट आहे. निवडणुका येत आहेत, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असंही त्या म्हणाल्या.
प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी अध्यादेश काढता. मग कृषी कायदे रद्द करणारा अध्यादेश का काढला नाही. आता का अध्यादेश काढला जात नाही. निवडणुका आल्यावरच अध्यादेश काढणार आहात का? केवळ निवडणुकीसाठी निर्णय घेणार आहात का? असा सवाल त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
त्या हत्या, आत्महत्या, ज्यामुळे मोदी सरकारला माफी मागावी लागली, माघार घ्यावी लागली?
VIDEO: मोदी म्हणाले, नवी सुरुवात करूया, दरेकर म्हणतात आजचा दिवस काळा, नेमका संदर्भ काय?