PM मोदी दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना, 15 व्या ब्रिक्स समिटमध्ये जिनपिंग यांची होऊ शकते भेट

| Updated on: Aug 22, 2023 | 3:21 PM

पंतप्रधान मोदी जोहान्सबर्ग नंतर ग्रीसला दौऱ्यावर जाणार आहेत. जिथे ते यजमान पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी दोन्ही देशांच्या संपूर्ण स्पेक्ट्रमवर तपशीलवार चर्चा करतील.

PM मोदी दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना, 15 व्या ब्रिक्स समिटमध्ये जिनपिंग यांची होऊ शकते भेट
Follow us on

मुंबई : 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी २४ ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेत राहणार आहेत. यादरम्यान ते अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दक्षिण आफ्रिका १५ व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवत आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत गेले आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी ग्रीसला भेट देणार आहेत. पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच ग्रीस दौरा असेल.पीएम मोदी हे 40 वर्षात ग्रीसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 1983 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अथेन्सला भेट दिली होती. यादरम्यान दोन्ही देश व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये सहकार्यावर चर्चा करतील.

PM मोदींचा दौरा कसा असेल

१. दिल्लीहून पंतप्रधान मोदी सकाळी ७.०० वाजता जोहान्सबर्गला रवाना. आज संध्याकाळीच ते जोहान्सबर्गला पोहोचतील. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
२. पंतप्रधान मोदी 5.15 वाजता (भारतीय वेळेनुसार) जोहान्सबर्गला पोहोचतील.
३. संध्याकाळी 7.30 वाजता ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये सहभागी होतील. पंतप्रधानांव्यतिरिक्त भारतातून जाणाऱ्या उद्योगपतींचे शिष्टमंडळ या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
४. पंतप्रधान मोदी रात्री 9.30 वाजता ब्रिक्स नेत्यांच्या रिट्रीट कार्यक्रमात सहभागी होतील. हा कार्यक्रम बंद दाराआड असणार आहे.

मोदी आणि जिनपिंग यांची भेट

रिट्रीट कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात भेट होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या G-20 परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. जवळपास वर्षभरानंतर मोदी-जिनपिंग यांच्या छोट्या भेटीत सीमावादावरही चर्चा झाल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले होते.

दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार असल्याचीही चर्चा आहे. जर ही द्विपक्षीय बैठक झाली, तर मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील सीमेवरील तणावानंतर ही त्यांच्यातील पहिली बैठक असेल. अधिकृतपणे परराष्ट्र सचिवांनी भेटीचा कार्यक्रम अद्याप अंतिम नसल्याचे सांगितले असले तरी.

2019 नंतर, BRICS (ब्राझील-रशिया-भारत-चीन-दक्षिण आफ्रिका) नेत्यांची भौतिक उपस्थितीत होणारी ही पहिली बैठक असेल. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जोहान्सबर्गला न जाण्याचे आधीच जाहीर केले आहे. BRICS हा पाच विकसनशील देशांचा समूह आहे जो जगातील लोकसंख्येच्या 41 टक्के, जागतिक जीडीपीच्या 24 टक्के आणि जागतिक व्यवसायाचे 16 टक्के प्रतिनिधित्व करतो.