बंगळुरू | 26 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसाची परदेश दौरा आटोपून भारतात दाखल झाले आहेत. मोदी ग्रीसवरून थेट बंगळुरू येथे दाखल झाले. यावेळी त्यांचं भव्य आणि अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांची भव्य रॅलीही निघाली. या रॅलीनंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना मोदींनी नवा नारा दिला. जय विज्ञान, जय अनुसंधान असा नारा मोदी यांनी दिला. मोदी यांच्या पाठोपाठ उपस्थितांनीही याच जोरजोरात घोषणा दिल्या. त्यानंतर भारत माता की जयच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या सेंटरमध्ये जायला निघाले आहेत. शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांना मोदी शुभेच्छा देणार आहेत. चांद्रयान मोहीम यशस्वी करणाऱ्या या शास्त्रज्ञांशी मोदी संवादही साधणार आहेत. त्यापूर्वी मोदी यांनी बंगळुरू येथील रॅलीला संबोधित केलं. चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. त्याबद्दल देशाला अभिमान आहे. शास्त्रज्ञांची जिद्द आणि उत्साह प्रेरणादायी आहे. बंगळुरूत आलो तर तुम्हाला भेटणार असल्याचं मी इस्रोच्या शास्त्रज्ञांना सांगितलं होतं. माझं मन शास्त्रज्ञांना भेटण्यास उत्सुक आहे, असं म्हणत मोदी यांनी जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा दिला.
पंतप्रधा नरेंद्र मोदी इस्रो सेंटरकडे जायला निघाले आहे. बंगळुरूपासून थेट इस्रो सेंटरपर्यंत त्यांचा रोड शो सुरू आहे. मोदींच्या ताफ्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा लोक हातात तिरंगा घेऊन उभे आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकांना हात उंचावून त्यांना अभिवादन करत आहेत.
मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला होता. देशाशी संवाद साधला होता. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी तिरंगाही फडकवला होता. त्यानंतर मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करू त्यांना शुभेच्छा दिली होती. त्यांच्या टीमचं कौतुक केलं होतं. आज मोदी या सर्वांना फेस टू फेस भेटणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोदी इस्रोच्या सेंटरमध्ये भाषण देण्याची शक्यता आहे. तसेच इस्रोच्या टीमशी भविष्यातील प्रकल्पांवरही चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. भारताने चंद्रावर पाऊल ठेवून आपली क्षमता दाखवून दिल्याचं मोदी यांनी म्हटलं होतं. त्यांनी ग्रीसमधून देशवासियांशी संवाद साधला होता.
चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिग होत असताना मला आपल्या कुटुंबासोबत (इस्रोचे सदस्य) थांबायचं होतं. पण मी आज तुमच्या सोबत नाहीये. मला परदेश दौऱ्यावर यावं लागलं. ब्रिक्स परिषदेच्यासाठी यावं लागलं. पण तुमच्या यशामुळे देशाची मान उंचावली आहे. जगभरातून आपल्यावर कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश म्हणून आपला गौरवाने उल्लेख होत आहे, असं मोदी म्हणाले होते.