नवी दिल्ली: संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात (HSC exam) केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. (PM Narendra Modi will chair an important meeting regarding Class 12 Board Examinations)
मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ही बैठक घेणार आहेत. आज संध्याकाळी ही बैठक होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारावीची परीक्षा कशी घ्यायची, याबाबतच्या पर्यायांवर सर्व राज्यातील शिक्षणमंत्री आणि तज्ज्ञांशी चर्चा करतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत काही महत्वाचा निर्णय घेणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Prime Minister Narendra Modi will chair an important meeting regarding Class 12 Board Examinations, this evening. He will be briefed on all possible options, as a result of the extensive discussions with all states and other stakeholders: GoI Sources pic.twitter.com/3sLKMPmOMW
— ANI (@ANI) June 1, 2021
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान दोन टप्प्यात बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सीबीएसई 24 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान परीक्षांचं आयोजन करु शकते.
मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षा आयोजित करताना केवळ मुख्य विषयांच्या पेपर घेऊ शकते. यामुळे बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यास देखील मदत होऊ शकणार आहे. सीबीएसई कडून बारावीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण 176 विषय निश्चित केलेले असतात. या विषयांपैकी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी विषय निवडायचे असतात. त्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप एल असे दोन भाग केलेले असतात. ग्रुप ए मधील विषय हे महत्त्वाचे मानले जातात. त्या आधारेच विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ग्रुप ए मध्ये 20 विषय असतात. त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांची तीन मुख्य विषयांची परीक्षा घेतली जाईल. याआधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
(PM Narendra Modi will chair an important meeting regarding Class 12 Board Examinations)