मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी 30,500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांना ते हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडचं ही उद्घाटन करणार आहेत. ज्याला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. देशातील हा सर्वात मोठा सागरी सेतू असणार आहे. अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात मोठा पूल आहे.
अटल सेतूची लांबी 21.8 किलोमीटर इतकी आहे. या पुलावर एकूण सहा लेन असणार आहेत. अटल सेतूच्या बांधकामासाठी सुमारे 17,840 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. 7 वर्षानंतर अटल सेतू पूर्णपणे तयार झाला असून त्याचा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. अटल सेतूमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईचं अंतर जलद पूर्ण होणार आहे.
अटल सेतूमुळे केवळ इंधनच वाचणार नाही तर वेळही वाचणार आहे. मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. अटल पुलामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील संपर्कातही सुधारणा होणार आहे. अटल सेतू राष्ट्राला समर्पित केल्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी या पुलावरून प्रवास करतील.
या पुलामुळे जेथे दोन तास लागत होते. त्या प्रवासाला आता फक्त २० मिनिटे लागणार आहेत. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सूटका होणार आहे. या पुलावर वेग मर्यादा १०० किमी प्रतितास ठेवण्यात आली आहे. या पुलावरुन मोटारसायकल, ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टर यांना प्रवास करता येणार नाहीये.
महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान मोदी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचेही उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी 12,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.