पवारांचं कौतुक, काँग्रेस टार्गेट, नरेंद्र मोदी यांची लोकसभेत जोरदार फटकेबाजी, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 10, 2023 | 1:38 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा काँग्रेसच्या (Congress) 60 वर्षांच्या कारभारावरुन टीका केली. पण त्यांनी आज शरद पवारांचं (Sharad Pawar) कौतुक केलं.

पवारांचं कौतुक, काँग्रेस टार्गेट, नरेंद्र मोदी यांची लोकसभेत जोरदार फटकेबाजी, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us on

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानींवरचे (Gautam Adani) आरोप आणि त्या आरोपांवर जेपीसी नेमण्याची मागणी लोकसभेत आजही सुरु राहिली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा काँग्रेसच्या (Congress) 60 वर्षांच्या कारभारावरुन टीका केली. नेहरुंचं सरनेम का लावत नाहीत? म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रश्नही केला. विशेष म्हणजे शरद पवारांचं (Sharad Pawar) कौतुक करत मोदींनी काँग्रेसवर पाडापाडीच्या राजकारणाचेही आरोप केले. पंतप्रधान मोदींनी पुन्हा काँग्रेसच्या 60 वर्षाच्या कारभारावर टीका केली. एकीकडे मोदी विरोधकांवर टीका करत होते आणि दुसरीकडे विरोधकांच्या मोदी-अदानींच्या नावानं घोषणाबाजी सुरु होती.

यावेळी मोदींनी मात्र आडनावावरुनही प्रश्न उभे केले. नेहरुंच्या पिढीतले व्यक्ती त्यांचं आडनाव लावायला का घाबरतात? असा प्रश्न मोदींनी केला.

नेहरु हे मूळ काश्मिरी ब्राह्मण

नेहरु हे मूळ काश्मिरी ब्राह्मण होते. त्यांच्या पूर्वजांचं आडनाव कौल होतं. कालांतरानं त्यांचे पूर्वज काश्मिरातून दिल्लीत स्थलांतरीत झाले. दिल्लीत एका नहरच्या बाजूला म्हणजे एका तलावाच्या जवळ घर घेतलं.

नहरच्या जवळ राहणारे लोक म्हणून नेहरुंच्या पूर्वजांचं नाव नेहरु म्हणूनरुढ होऊ लागलं. असं म्हणतात की, पुढे वकिलीच्या वेळेस मोतीलाल नेहरुंनी स्वतःचं नाव कौलऐवजी नेहरु म्हणून लावलं.

फिरोज यांचं मूळ आडनाव काय होतं?

पंडित जवाहरलाल नेहरुंच्या एकमेव कन्या इंदिरा गांधींनी फिरोज गांडी यांच्याशी विवाह केला. फिरोज गांधी हे पारशी होते. पारशी समाजातही गांधी आडनाव आहे. पण काही जण असं म्हणतात की फिरोज यांचं आडनाव हे घांडी होतं. रामचंद्र गुहांच्या इंडिया आफ्टर गांधी पुस्तकानुसार महात्मा गांधींच्या प्रभावानंतर त्यांनी स्वतःच आडनाव गांधी असं केलं. तर काही जण म्हणतात की फिरोज यांचंही मूळ नाव आधीपासून गांधीच होतं.

बहुतांश महिला आपल्या नावापुढे सासरचं आडनाव लावतात. त्यानुसार इंदिरा यांचं सासरचं आडनाव गांधीच येतं. जर मोदींचा निशाणा प्रियंका गांधींवर असेल, तर प्रियंका यांच्या सासरचं आडनाव वॉड्रा येतं, पण ट्विटर आणि इतर सोशल मीडिया खात्यांवर प्रियंका यांचं नाव प्रियंका गांधी-वॉड्रा असंच आहे.

दरम्यान अदानींवरुन होणाऱ्या आरोपांवर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या कारभाराकडे बोट दाखवत टीका केली. जितकी चिखलफेक होईल, तितकंच कमळ उमलेल, असं मोदी म्हणाले.

दरम्यान एकीकडे संसदेत अदानींवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस शासित हिमाचल सरकारनं छापेमारी सुरु केलीय. हिमाचल सरकारनं अदानी समुहाचे गोडाऊन आणि कार्यालयांवर छापे टाकले. करचोरीच्या संशयावरुन हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. तूर्तास संसदेच्या आत असो की मग संसदेबाहेर अदानींवरुन काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष वाढत जातोय.