नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर (congress) हल्ला चढवल्यानंतर आज पुन्हा राज्यसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच मोठ्या खुबीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांचे तीनदा नाव घेत कौतुक केलं. अचानक दृष्टी गेल्यावर शेवटचं जे चित्रं डोळ्यासमोर असंत तेच चित्रं कायम राहतं. तसंच काँग्रेसचं झालं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून काही तरी धडा घ्या. आजारी असूनही ते मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहित करत आहेत. तुम्हाला एवढं नैराश्य का?, असा बोचरा सवालही मोदींनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाची त्यांचं नाव न घेता चिरफाड केली. गुजरातमध्ये एक गोष्ट बोलली जाते. महाराष्ट्रातही तीच बोलली जात असेल. कदाचित शरद पवारांना माहीत असेल. जेव्हा हिरवळ असते, शेत-शिवार हिरवगार झालेलं असतं आणि कुणी जर ती हिरवळ पाहिली असेल तर त्याच वेळी अपघात होऊन त्याचे डोळे गेले तर आयुष्यभर त्याला तो हिरवं चित्रं दिसत असतं. तसंच 2013पर्यंत दुर्दशेत दिवस काढले. 2014मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना ते जुने दिवसच दिसणार, असा हल्लाच मोदींनी राहुल गांधींवर लगावला.
सार्वजनिक जीवनात चढ उतार येत असतात. जय-पराजय होत असतात. त्यातून जी व्यक्तिगत निराशा निर्माण होते ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर बसलो म्हणजे देशाची चिंता करायची नाही असं असतं का? कोणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. आपल्याला नाराज होण्याची गरज नाही. तुम्ही नाराज होत असाल तर तुमचे जे मतदारसंघ आहेत तिथले लोकही उदास होतील, असा हल्लाही त्यांनी चढवला.
सत्ता कुणाचीही असो पण देशाच्या सामर्थ्याला कमी लेखू नये. देशाच्या सामर्थ्याचा गुणगौरव केला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. काही लोकांनी व्हॅक्सिनेशन इज नॉट बिग डील असं काही म्हटलं. भारताने एवढी मोठी कामगिरी केली आहे, ही कामगिरी वाटत नाही का? एका खासदाराने तर लसीकरणावर व्यर्थ खर्च होत आहे असं म्हटलं.. देशानं ऐकलं तर काय म्हणेल? कोरोना जेव्हापासून मानव जातीवर संकट निर्माण करत आहेत तेव्हापासून सरकारने या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केलं आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
PM Narendra Modi Speech : फुटीरतावादी मानसिकता काँग्रेसच्या DNAमध्येच; मोदींची संसदेत जहरी टीका