नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : देशात प्रचंड महागाई वाढली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तर अतिशय जास्त वाढ झालीय. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक सातत्याने याबाबत तक्रार करताना दिसतात. देशातील घराघरातील महिला या गॅस सिलेंडरच्या दराबाबत तक्रार करताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकदा मोदी सरकारवर अनेकांनी टीका केली आहे. अखेर सर्वसामान्यांची महागाईच्या तक्रारीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी आज खूप मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. तसेच आगामी काळात राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्याआधी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा डबल फायदा उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना होईल, अशीदेखील माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी तब्बल 400 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त होणार आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. निवडणुका वगैरे यांच्या कारणासाठी नाही तर ओनम आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून केंद्र सरकारने देशभरातील सर्व बघिणींना एक गिफ्ट दिलं आहे. विशेष म्हणजे फक्त एका वर्गासाठी नाही तर सर्व वर्गांसाठी याबाबतचा हा निर्णय घेण्यात आला आहे, असं अनूराग ठाकूर यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचंदेखील ते यावेळी म्हणाले.
देशभरातील 33 कोटी ग्राहकांसाठी 200 रुपये प्रतिसिलेंडर दर कमी करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले. विशेष म्हणजे देशभरात 75 लाख मोफत गॅस कनेक्शनचं मोफत वाटप केलं जाणार असल्याचीदेखील घोषणा अनुराग ठाकूर यांनी केली. त्यामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिसाला मिळणार आहे.