संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : देशात महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा बसावा यासाठी केंद्र सरकारकडून कडक कायदे करण्याबाबतच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या समाजात अनेक घटना बघायला मिळत आहेत. काही पुरुष पत्नीपासून लपवून विवाहबाह्य संबंध ठेवतात. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये संबंधित पुरुष हे दुसऱ्या महिलेला आपलं लग्न झालंय याची कल्पनादेखील देत नाहीत. ते लग्न झाल्याची माहिती लपवून दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवतात. काही जण तर पहिलं लग्न लपवून दुसरंही लग्न करतात. अशाप्रकारे ते दोन महिलांना फसवतात. पण अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. कारण केंद्र सरकारने तशा हालचाली सुरु केल्या आहेत.
विवाहित असताना अविवाहित असल्याचा दिखावा करून किंवा खरी ओळख लपवून लग्न करणाऱ्यांना आता यापुढे 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कारण केंद्र सरकार लवकरच याबाबत विधेयक आणणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे याबाबतच विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये आपली ओळख लपवून, धर्म लपवून, जात लपवून लग्न करणारे किंवा संबध प्रस्थापित करणाऱ्या पुरुषांवर देखील कडक कारवाई करण्याबाबतचा कायदा असणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पावसाळी अधिवेशनात भारतीय दंड संहिता (IPC) 1860 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारतीय न्यायिक संहिता 2023 (BNS) विधेयक IPC लोकसभेत सादर केले होते. या विधेयकात महिलांवरील गुन्ह्यांबाबत कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. या विधेयकात महिलेची ओळख लपवून तिच्याशी लग्न करणे हा गुन्हा ठरवण्यात आलाय. तसंच या तरतुदींमुळे सरकार लव्ह जिहादवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
याप्रकरणी आणखी एक महत्त्वाची माहिती मिळत आहे. एखाद्या व्यक्तीने आपली ओळख लपवून लग्न केलं किंवा महिलेशी संबंध प्रस्थापित केले. तर तो बलात्कार मानला जाणार नाही. पण छळ नक्कीच मानला जाईल. तरीही संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल. त्याच्यावर 10 वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूर असण्याची शक्यता आहे.