नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मोदींच्या या अमेरिका दौऱ्याकडे भारत-अमेरिका संबंधातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिलं जातय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या अमेरिका दौऱ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प्रायव्हेट डिनर ते व्हाइट हाउस पार्कमध्ये मोदींच भव्य स्वागत करण्यात येईल. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर मोदींचा हा 6 वा अमेरिका दौरा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहा दौऱ्यांमध्ये अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केलीय. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांचा समावेश आहे.
विस्टन चर्चिल, नेल्सन मंडेला यांच्यानंतर हा मान नरेंद्र मोदींना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन खूप उत्साहित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनला न्यू यॉर्कमध्ये दाखल होतील. एंड्रयूज एयर फोर्स बेसवर भारतीय अमेरिकन नागरिक त्यांच स्वागत करतील. पंतप्रधान मोदींच्या या अमेरिका दौऱ्याची इतिहासात नोंद होईल. कारण ते दुसऱ्यांदा अमेरिकी काँग्रेसला संबोधित करणार आहेत. याआधी फक्त दोन नेत्यांना हा मान मिळालाय. यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला आहेत.
मोदींच्या दौऱ्याचा भारताला फायदा काय?
पंतप्रधान मोदींचा हा अमेरिका दौरा यासाठी महत्वाचा आहे, कारण यामध्ये संरक्षण आणि टेक्नोलॉजी संदर्भात काही महत्वाचे करार होणार आहेत. चीन आणि पाकिस्तानचा धोका लक्षात घेता, भारत अमेरिकेबरोबर प्रीडीएटर ड्रोनचा करार करणार आहे.
ही ड्रोन अमेरिकेकडून भारताला मिळाल्यास शत्रूवर खोलवर अचूक वार करता येईल. त्याशिवाय फायटर विमानांना लागणाऱ्या इंजिनसाठी ट्रान्सफर ऑफ टेक्नलॉजीचा महत्वपूर्ण करार होऊ शकते. याचा फायदा भारताला आपल्या तेजस मार्क 2 या लढाऊ विमानांसाठी होऊ शकतो.