नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल, शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो असू, त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत, असं म्हणत पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची भूमिका जाहीर केली. शेतकऱ्यांनी आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय कारण सांगितलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता देशवासियांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. कायद्याच्या ज्या तरतुदीवर शेतकऱ्यांचा आक्षेप होता, तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे तहकूब करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो, की आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. आम्ही दिव्यासारखे प्रकाशमान सत्य काही शेतकऱ्यांना समजवू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे रद्द करण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, असं मोदी म्हणाले. शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये. त्यांनी आपआपल्या घरी जावं. शेतावर काम करावं, अशी विनंतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाअखेरीस केली.
कोणते कृषी कायदे वादग्रस्त?
1 कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
2 हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020
3 जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020
“कृषी कायदे शेतकरी हिताचेच”
आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करतं. संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेने चांगली नियत ठेवून आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून या कायद्याचं स्वागत आणि समर्थन झालं, त्यांचे आम्ही आभार मानतो. मात्र एक वर्ग विरोध करत होता. ते आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. अनेकांनी त्यांना या कायद्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्नही केला. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. त्यांचं म्हणणं आणि तर्कही जाणून घेतला. त्यात कसूर ठेवली नाही, असंही मोदी म्हणाले.
किसानों की स्थिति को सुधारने के इसी महाअभियान में देश में तीन कृषि कानून लाए गए थे।
मकसद ये था कि देश के किसानों को, खासकर छोटे किसानों को, और ताकत मिले, उन्हें अपनी उपज की सही कीमत और उपज बेचने के लिए ज्यादा से ज्यादा विकल्प मिले: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 19, 2021
पाहा नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण
संबंधित बातम्या:
केंद्रीय कृषी कायदे रद्द, सर्वात मोठी घोषणा करताना नरेंद्र मोदी काय म्हणाले?
केंद्रीय कृषी कायदे रद्द, पंतप्रधान मोदींच्या घोषणेतील आठ महत्त्वाचे मुद्दे