पंतप्रधानांसमोर ‘ती’ विजेच्या टॉवरवर चढली, मोदी विनंती करत राहिले, पण मुलगी ऐकेना

| Updated on: Nov 11, 2023 | 9:32 PM

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या हैदराबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांची सभा सुरु असताना एक मुलगी थेट लाईटच्या टॉवरवर चढते आणि घोषणाबाजी करते. यावेळी उपस्थितांमध्येही खळबळ उडते. अखेर मोदींचं या मुलीकडे लक्ष जातं. मोदी तिला खाली उतरण्यासाठी खूप विनंती करतात.

पंतप्रधानांसमोर ती विजेच्या टॉवरवर चढली, मोदी विनंती करत राहिले, पण मुलगी ऐकेना
Follow us on

हैदराबाद | 11 नोव्हेंबर 2023 : देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकांचं विगूल वाजलं आहे. त्यामुळे प्रचारसभांचा जोरदार धडाका या राज्यांमध्ये सुरु आहे. या पाचही राज्यांमध्ये विविध पक्षांचे नेतेमंडळी एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. असं असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. नरेंद्र मोदी एका सभेत भाषण करत असताना एक धक्कादायक प्रकार घडला. एक मुलगी थेट लाईटच्या टॉवरवर चढते. यावेळी नरेंद्र मोदी यांचं लक्ष तिच्याकडे जातं. यावेळी नरेंद्र मोदी या मुलीला खाली उतरण्यासाठी प्रचंड विनवण्या करतात. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झालाय.

नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करत होते. यावेळी एक मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत करण्यासाठी लाईटच्या टॉवरवर चढते. यावेळी गर्दीमध्ये अचानक खळबळ उडते. काही जण घाबरतात. या गदारोळामुळे नरेंद्र मोदींचं तिच्याकडे लक्ष जातं. नरेंद्र मोदी तातडीने या मुलीला लाईट टॉवरच्या खाली येण्यासाठी विनंती करतात. ते त्यांना सातत्याने खाली येण्यासाठी विनवण्या करतात. मुलगी खाली येण्यासाठी तयार होत नाही. नरेंद्र मोदींनी वारंवार विनंती केल्यानंतर शेवटी ती खाली उतरते.

नरेंद्र मोदी नेमकं काय आवाहन करतात?

“बेटा खाली ये…बेटा खाली ये…बघ बेटा लागून जाईल…बेटा हे बरोबर नाही…आम्ही तुमच्यासोबत आहोत..प्लीज…तुम्ही खाली या…मी विनंती करतो तुम्ही खाली या…मी तुमचं म्हणणं ऐकणार…तिथे शॉर्ट सर्किट आहे…तुम्ही खाली या…हे बरोबर नाही…असं केल्याने काहीच फायदा होणार नाही…मी इथे तुमच्यासाठी आलो आहे”, असं नरेंद्र मोदी भाषण थांबवून मुलीला विनंती करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विनंतीनंतर ही मुलगी खाली येते. यावेळी मोदी या मुलीला थँक्यू म्हणतात. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अनेकांकडून शेअरही केला जातोय.