नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डिजिटल हेल्थ मिशन (PM-DHM) लाँच केले. डिजिटल हेल्थ मिशन हे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या पायलट प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना राबवण्यात आली. आता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB PM-JAY) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनला राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला आहे.
* आयुष्मान भारत डिजिटल मिशन आता देशभरातील रुग्णालयांचे डिजिटल आरोग्य उपाय एकमेकांशी जोडले जातील. या अंतर्गत देशवासीयांना आता डिजिटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य रेकॉर्ड डिजिटल संरक्षित केले जाईल. देशातील सर्व रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा, औषधाची दुकाने देखील नोंदणीकृत केली जातील.
* देशात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर देणारे मॉडेल विकसित केले जाईल. रुग्णांना सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपचार मिळतील. डिजिटल हेल्थ आयडी द्वारे, रुग्ण स्वतः आणि डॉक्टर देखील आवश्यक असल्यास जुन्या नोंदी तपासू शकतात. यामध्ये, डॉ., नर्स, पॅरा-मेडिक सारख्या सहकाऱ्यांची नोंदही असेल.
* भारताच्या आरोग्य क्षेत्राच्या विकासाबाबत ते म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी वैद्यकीय शिक्षणात अभूतपूर्व सुधारणा होत आहेत. 7-8 वर्षांच्या तुलनेत आज देशात अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिकल मनुष्यबळ तयार केले जात आहे.
* उत्तम वैद्यकीय व्यवस्थेसोबतच गरीब आणि मध्यमवर्गीयांनी औषधांवर कमीत कमी खर्च करणे आवश्यक आहे. म्हणूनच केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधे, शस्त्रक्रियेसारखी, डायलिसिस सारख्या अनेक सेवा आणि स्वस्त गोष्टी ठेवल्या आहेत.
* आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत उपचार घेतले आहेत, किंवा जे आता उपचार घेत आहेत त्यांच्यापैकी असे लाखो जण असे आहेत, जे या योजनेपूर्वी रुग्णालयात जाण्याचे धाडस करू शकले नाहीत.
* आयुष्मान भारत PM JAY ने गरिबांच्या जीवनाची मोठी चिंता दूर केली आहे. आतापर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांनी या योजनेअंतर्गत मोफत उपचाराची सुविधा घेतली आहे.
* कोरोना काळात टेलिमेडिसीनचा अभूतपूर्व विस्तारही झाला आहे. आतापर्यंत सुमारे 125 कोटी दूरस्थ सल्लामसलत ई-संजीवनीद्वारे पूर्ण झाली आहे. यामुळे, देशाच्या दुर्गम भागात राहणारे हजारो देशवासी घरी बसून शहरांच्या मोठ्या रुग्णालयांच्या डॉक्टरांशी जोडले जात आहेत.
* मोफत लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपर्यंत 90 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. यासाठी कोविन अॅपचा प्रभावी वापर करण्यात आला.
* 130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाइल ग्राहक, सुमारे 800 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते, सुमारे 43 कोटी जन धन बँक खाती, जगात कुठेही इतकी मोठी कनेक्टेड यंत्रणा नाही. ही डिजिटल पायाभूत सुविधा भारतीय नागरिकांना जलद, पारदर्शक पद्धतीने सेवा पुरवत आहे.
* मला आनंद आहे की आजपासून संपूर्ण देशात आयुष्मान भारत डिजिटल मिशन देखील सुरू होत आहे. हे मिशन देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या उपचारामध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्यात मोठी भूमिका बजावेल. गेल्या सात वर्षांत देशातील आरोग्य सुविधा मजबूत करण्याची मोहीम आजपासून एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एक मिशन सुरू होत आहे, ज्यामध्ये भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांती घडवण्याची शक्ती आहे.