पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काशी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधानांनी कालच्या व्यस्त दिवसानंतरही मध्यरात्रीपर्यंत ते वाराणसीच्या कामांचा आढावा घेत होते. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा आधी दौरा केला तर मध्यरात्रीनंतर त्यांनी वाराणसीच्या रेल्वे स्टेशनची पहाणी केली. स्टेशनच्या बाहेर असलेल्यांसोबतही पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. त्याचे फोटोज पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केलेत. त्यामुळे मध्यरात्री उशिरापर्यंत जागे असतानाही मोदींच्या आजच्या कार्यक्रमात काहीही बदल केलेला नाही. आजचा दिवसही त्यांचा व्यस्त असणार नाही. दुपारी 4 नंतर ते दिल्लीकडे रवाना होतील.
वाराणसीचा दुसरा दौरा तसा पक्षीय कार्यक्रमानं भरलेला आहे. म्हणजे सकाळी साडे नऊ वाजता नरेंद्र मोदी यांची भाजपच्या काशी वाराणसी महानगर तसच जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत औपचारिक बैठक आहे. या बैठकीत मोदी अर्धा तास असतील. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचा मौसम आहे. त्यामुळे छोट्यातल्या छोट्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मोदी दौऱ्याचा वापर केला जातोय. त्यानंतर सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी भाजपशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असतील. खरं तर मोदींच्या बैठकीत मुख्यमंत्री स्वत: प्रझेंटेशन करतील. ह्या बैठकीला, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, गुजरात. कर्नाटक, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री सहभागी होतायत. बिहार आणि नागालँडचे भाजप उपमुख्यमंत्रीही बैठकीत असणार आहेत. प्रत्येक मुख्यमंत्री हा त्यांच्या राज्यात चालू असलेल्या मोठ्या योजनांवर सादरीकरण करणार आहे. ही बैठक 4 तास चालणार आहे. यावरुनच ह्या बैठकीचं किती महत्व आहे याचा अंदाज येऊ शकतो. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक वेळ दिला आहे.
पंतप्रधान मोदी हे भाजपच्या मुख्यमंत्र्यांची आज शाळा घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्र्याला त्याच्या राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या मोठ्या योजनांवर मोदींसमोर सादरीकरण करायचे आहे. त्यावर मोदींच्या तिखट प्रश्नांना उत्तरही द्यावं लागेल. गेल्या काही काळात कर्नाटक, आसाम, उत्तराखंड अशा राज्यात भाजपनं खांदेपालट केलाय. तिथं मुख्यमंत्रीपदी असलेले नेते नवे आहेत. त्यामुळेच ते काय करतायत, कुठल्या योजना राबवतायत त्याचा हिशेब देण्याघेण्याचं काम बैठकीत होणार आहे.
भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक संपल्यानंतर नरेंद्र मोदी हे दुपारी तीन वाजता स्वर्वेद मंदिरात जातील. तिथं त्यांचा अडीच तासाचा कार्यक्रम निर्धारीत आहे. इथं ते अनुयायांना संबोधीत करतील. स्वर्वेद मंदिराचा 98 वा वार्षिकोत्सव कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर साडे चार वाजता मोदी दोन दिवसांचा दौरा आटोपून दिल्लीला रवाना होतील.
इतर बातम्या: