नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक व्हायरल झाला आहे. डोक्यावर हॅट, हातात जॅकेट आणि डोळ्याला चष्मा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा लूक व्हायरल झाला आहे. बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये मोदींचा दौरा आहे. या जंगल सफारीसाठी मोदींनी तयारी केली आहे. तोच फोटो आता व्हायरल होत असून मोदींच्या या अनोख्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे. मोदी आज ही जंगल सफारी करणार आहेत. त्यासाठी ते कालच मैसुरू येथे पोहोचले. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मोदी आज वाघांची संख्या सांगणार आहेत. या वाघांची गणती सुरूही झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाघांची संख्या सांगणार आहेत. मात्र, त्यापूर्वी अमृत काल व्हिजन आणि इंटरनॅशनल बिग कॅट्स अलान्सचा शिलान्यासही करणार आहेत. आयबीसीए हा अनेक देशांचा एक ग्रुप आहे. येथे मार्जर प्रजातीचे सात प्राणी आहेत. त्यात वाघ, हिम बिबट्या, जगुआर, पुमा, सिंह आदी प्राणी आहेत. ही संस्था वाघांचं संरक्षण आणि सुरक्षेवर लक्ष ठेवते. कूनो नॅशनल पार्कात काही दिवसांपूर्वी मोदींनी चित्ते सोडले होते. त्यावेळी त्यांनी फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवला होता.
मोदी आज कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये जात आहेत. यावेळी ते कामगारांशी चर्चा करणार आहेत. तसेच स्मारकाशी संबंधित एक नाणंही मोदी जारी करणार आहेत. पुढील महिन्यात कर्नाटकात निवडणुका आहेत. 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा कर्नाटक दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.
PM @narendramodi is on the way to the Bandipur and Mudumalai Tiger Reserves. pic.twitter.com/tpPYgnoahl
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी राष्ट्रवादीनेही कर्नाटकात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात सहा ते सात जागा लढणार असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. कर्नाटकातील मराठी बहुल भागात राष्ट्रवादी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे कर्नाटकात यंदा चुरशीची लढत होताना दिसणार आहे. भाजपनेही पुन्हा पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने कर्नाटकात आक्रमक प्रचार सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.