लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या आधी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण संयमाच्या भूमिकेचा काँग्रेसलाच फटका बसत आहे. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख संपली आहे. काँग्रेससह विरोधी आघाडीच्या मित्रपक्ष इंडिया आघाडीला जागावाटपासाठी संघर्ष करावा लागत आहे. तामिळनाडू व्यतिरिक्त, बिहार आणि महाराष्ट्र, ज्या दोन राज्यांमध्ये INDIA आघाडीतील युतीचा मार्ग सर्वात सोपा मानला जात होता. पण इथेच काँग्रेससमोर मोठी आव्हाने आली आहेत.
बिहारमध्ये काँग्रेस आरजेडीसोबत युतीमध्ये आहे. तिकडे लालू प्रसाद यादव हे काँग्रेसला हव्या तितक्या जागा देण्यासाठी तयार नाही. तर त्याचवेळी महाराष्ट्रात जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभी राहिली. पण आता चार जागांवर उद्धव ठाकरे काँग्रेसला एकही जागा द्यायला तयार नाहीत ज्या काँग्रेसला हव्या आहेत. बिहारच्या संदर्भात काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व लालूप्रसाद यांच्यावर जवळपास आंधळेपणाने विश्वास ठेवत आहे, पण आरजेडीने जागावाटपात तसं काँग्रेसला हवं तितकं महत्त्व दिलेलं नाही.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या पप्पू यादव यांना पूर्णिया मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, परंतु सर्व प्रयत्न करूनही आरजेडी यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे. कारण त्यांनी आधीच विमा भारती यांना येथून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसने १० जागांची मागणी केली आहे. पण लालू यादव त्यांना नऊ जागा देण्याच्या तयारीत आहेत. पण त्यासाठी ही त्यांना झारखंडच्या दोन जागा देण्याची अट ठेवली आहे. त्यामुळे या भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे.
पोटनिवडणुकीत २२ हजार मतांनी पराभूत झालेल्या बाल्मिकी नगरसारखी काँग्रेसची बलाढ्य जागा देखील आरजेडीने घेतली आहे. इतकेच नाही तर मिथिलांचलमधील ब्राह्मणांचे वर्चस्व असलेल्या दरभंगा, मधुबनी, झांझारपूर, सीतामढी आदी ठिकाणी काँग्रेसला एकही जागा दिलेली नाही.
बिहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर कुमार झा यांनी आरजेडीच्या या भूमिकेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी लालू जागावाटपाचा मुद्दा शेवटच्या क्षणापर्यंत खेचतात. काँग्रेस नेतृत्वाने नेहमीच लालू यादव कुटुंबाला त्यांच्या संकटकाळात साथ दिली आहे.
महाराष्ट्रात सांगली, भिवंडी, मुंबई-उत्तर-पश्चिम आणि मुंबई-दक्षिण मध्य या चार जागांवर उद्धव ठाकरे हे काँग्रेसला अजिबात वाव देताना दिसत नाहीयेत. उद्धव ठाकरे यांनी तर 17 जागांवर उमेदवार देखील जाहीर करुन टाकले आहेत. ज्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे युती धर्माच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. पण यातून काँग्रेसला जागा सुटेल अशी शक्यता कमीच दिसत आहे.
काँग्रेसचे नेतृत्व यावर कोणतीही भूमिका घेत नसल्याने पक्षातील नेते अन्य पर्याय तपासत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी नेतृत्वालाच अल्टिमेटम दिला आहे. आमदार विश्वजित कदम यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत येऊन काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आणि संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. सांगलीच्या जागेसाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली. मात्र उद्धव यांच्या भूमिकेत अद्याप बदल झालेला नाही.