राजकीय रणनीतिकार आणि जन सुराज पक्षाचे संयोजक प्रशांत किशोर नेहमी राजकीय चर्चेत असतात. अनेक बड्या राजकीय पक्षांची रणनीती बनवण्यात त्यांचा वाटा असतो. राजकीय पक्षांना त्यांचा सल्ला लाभदायी ठरत असतो. प्रशांत किशोर निवडणूक रणनितीकार म्हणून काम पाहत असताना राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांना सल्ला देण्याचे काम करत होते. केवळ एक सल्ला देण्याचे ते 100 कोटी रुपये घेत होते, असा खुलासा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
प्रशांत किशोर यांनी बिहारमधील पोटनिवडणुकी दरम्यान बेलागंजमध्ये बोलताना ही माहिती दिली. येत्या 13 नोव्हेंबर रोजी बिहारमधील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्यात प्रशांत किशोर यांचा पक्ष जन सुराज पार्टीने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे. जन सुराज पक्षाचे उमेदवार मोहम्मद अमजद यांचा प्रचार करताना प्रशांत किशोर म्हणाले, मला नेहमी विचारले जाते निवडणूक अभियानासाठी पैसे कुठून आणणार? त्याचा उत्तर देत त्यांनी स्पष्टीकरण करताना सांगितले की, कोणत्याही पक्षाला किंवा राजकीय नेत्यांना सल्ला देण्यासाठी मी 100 कोटी रुपये घेतो.
निवडणूक प्रचार सभेत प्रशांत किशोर यांनी सांगितले की, प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे दहा राज्यांमध्ये सरकार आली आहेत. मग आम्हाला आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी टेंट आणि तंबू लावण्यासाठी पैसे मिळणार नाही का? तुम्ही आम्हाला इतके कमकुवत समजत आहे का? बिहारमध्ये कोणी विचार केला नसेल, ऐकले नसेल इतकी रक्कम आम्ही एका निवडणुकीचा सल्ला देण्यासाठी घेतो. आम्ही एका निवडणुकीसाठी सल्ला देतो तेव्हा आमचे शुल्क 100 कोटी रुपये होते.
प्रशांत किशोर म्हणाले की, पुढील दोन वर्ष आम्ही निवडणुकीत टेंट आणि तंबू लावत राहिलो आणि त्यासाठी फक्त एका निवडणुकीत सल्ला दिला तर आमचे सर्व पैसे एका दिवसांत येतील. राजकीय सल्ल्यासाठी प्रशांत किशोर किती शुल्क घेतात, हे प्रथमच समोर आले आहे. यामुळे त्यांच्या वक्तव्याची सर्वसामान्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे.