नवी दिल्ली: पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसमध्ये जोरबैठका सुरू आहेत. आगामी काळात निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली व्हावी म्हणून काँग्रेसने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (priyanka gandhi)यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पृष्टीही दिली आहे. मात्र, त्याबाबत कॅमेऱ्यासमोर कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यात गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी काँग्रेससोबत काम करावं याबाबतही चर्चा झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस नेते आणि प्रशांत किशोर यांच्यात चर्चा झाली होती. पण त्यानंतर चर्चा पुढे गेली नव्हती. आता पुन्हा पाच राज्यातील निवडणुकांनंतर प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाल्याने या भेटीचे अनेक तर्क काढले जात आहेत.
निवडणूक मोहीम राबवण्यासाठी काँग्रेसने प्रशांत किशोर यांचे माजी सहकारी सुनील कानुगोलू यांच्यासोबत एक कंत्राट साईन केलं आहे. सध्या प्रशांत किशोर हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससाठी रणनीती तयार करत आहेत. कानुगोलू यांनी गेल्या महिन्यातच काँग्रेससोबत काम सुरू केलं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे काँग्रेससोबत काम करण्याची शक्यता कमी दिसत आहे. कानुगोलू आणि प्रशांत किशोर यांनी 2014मध्ये सिटिजन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नेन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम केलं होतं. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी वेगळा मार्ग निवडला होता. तर कानुगोलू यांनी भाजपसाठी काम सुरू होतं. त्यानंतर 2017मध्ये भाजपला उत्तर प्रदेशात विजयही मिळाला होता.
कानुगोलू आणि प्रशांत किशोर हे दोघे एकत्रं काम करतील का? असा सवाल काँग्रेसपुढे आहे. हिंदुस्तान टाईम्समधील वृत्तानुसार, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेससोबत काम करण्यास दोघांनाही वाव आहे. कानुगोलू सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या कामावर फोकस ठेवून आहेत. त्यांच्यावर आणखी नव्या सेलची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी गुजरात आणि हिमाचलप्रदेशमध्ये लक्ष घातलं तर आपल्याला काहीच अडचण नाही, असं कानूगोलू यांनी गांधी कुटुंबाला सांगितल्याचं समजतं.
संबंधित बातम्या:
NITIN GADKARI आज सांगली दौऱ्यावर, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण
MSRTC Strike: एसटी कामगारांना 31 मार्चपर्यंतची डेडलाईन, अजितदादा म्हणाले, ही शेवटची संधी, मग मात्र…