नवी दिल्ली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण (Vaccination) करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे. आता गर्भवती महिलादेखील कोरोनाची लस घेऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना लस देण्याच्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायजेशनच्या (NTAGI) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. (Pregnant Women Can Get Vaccinated, CoWIN Registration, Walk-In Allowed)
आरोग्य मंत्रालयाच्या मंजुरीनंतर आता कोणतीही गर्भवती महिला कोव्हिन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करू शकते, किंवा जवळच्या लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस देखील घेऊ शकते. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिला गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यावर लस घेऊ शकतात. गर्भवती महिलांना लस देण्यासाठी परिचालन मार्गदर्शक सूचना (ऑपरेशनल गाइडलाइन) जारी करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि FLWs साठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांना दिले जाणारे IEC साहित्य सर्व राज्यांना पुरविण्यात आले आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नुकताच एक अभ्यास जाहीर केला आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा गर्भवती महिला आणि नुकतीच प्रसुती झालेल्या मातांवर अधिक परिणाम दिसून आला आहे. गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या लाटेत जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
गर्भवती महिला आणि ज्या स्त्रियांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे, अशा किती महिला कोरोनाबाधित झाल्या आहेत किंवा पहिल्या लाटेत अशा किती महिला कोरोनाबाधित झाल्या होत्या, याबाबतचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अशी प्रकरणे अधिक आढळली आहेत. पहिल्या लाटेच्या काळात अशी 14.2 टक्के प्रकरणे निदर्शनास आली होती. तर दुसऱ्या लाटेच्या काळात ही संख्या दुप्पट झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात आतापर्यंत 28.7 टक्के अशा प्रकारची प्रकरणे समोर आली आहेत. मृत्यूदरात तर तब्बल 8 पटींनी वाढ झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये पहिल्या लाटेच्या काळात मृत्यूदर 0.7 टक्के इतका होता. तर दुसऱ्या लाटेत हाच मृत्यूदर 5.7 टक्के इतका होता. या अभ्यासासाठी 1530 गर्भवती महिला आणि मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.
पहिल्या आणि दुसर्या लाटेतील मिळून एकूण मृत्यूचे प्रमाण दोन टक्के होते, यातील बहुतेकजण न्यूमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अधिक त्रस्त होते. अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले आहे की, गर्भवती महिलांसाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे.
संबंधित बातम्या
लस न घेतलेल्यांचा पगार वाढणार नाही; कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कंपन्यांची कठोर पावलं
(Pregnant Women Can Get Vaccinated, CoWIN Registration, Walk-In Allowed)