नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : तामिळनाडूचे मंत्री आणि डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलावण्यात आलं नसल्याने त्यावरून उदयनिधी यांनी भाजपला सवाल केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या आदिवासी आहेत. विधवा आहेत. त्यामुळेच त्यांना संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलावलं नाही, असा गंभीर आरोप करतानाच हाच का तुमचा सनातन धर्म? असा सवालही उदयनिधी यांनी केला आहे. उदयनिधी यांनी दुसऱ्यांदा धक्कादायक विधान करून नव्या वादाला फोडणी दिली आहे.
उदयनिधी स्टॅलिन मदुराईत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही त्याविरोधात आवाज उठवणं सुरूच ठेवणार आहोत. 800 कोटी रुपये खर्च करून नवीन संसद भवन तयार करण्यात आलं. मात्र, देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही. कारण त्या आदिवासी समाजातून येतात. त्या विधवा आहेत. त्यामुळेच त्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं, असं उदयनिधी म्हणाले.
नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं. तामिळनाडूतील संतांना बोलावलं. पण राष्ट्रपतींना आमंत्रित केलं नाही. हाच का सनातन धर्म आहे? राष्ट्रपतींना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलावलं तर नाहीच, पण विद्यमान लोकसभेच्या विशेष अधिवेशनालाही पाचारण केलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करण्यात आलं. तेव्हा हिंदी अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आलं. पण राष्ट्रपतींना अधिवेशनापासून दूर ठेवलं गेलं. अशा घटना याच सनातन धर्माच्या वाढत्या प्रभावाचे संकेत आहेत, असंही त्या म्हणाल्या.
सनातन धर्मावरून केलेल्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोकांनी माझ्या डोक्याची किंमत ठरवली आहे. अशा गोष्टींमुळे मी कधीच त्रस्त होत नाही. सनातन धर्म संपुष्टात आणण्यासाठीच डीएमकेची स्थापना करण्यात आली आहे. आपलं लक्ष्य पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.