संगीतावर अशा थिरकल्या टांझिनियाच्या राष्ट्राध्यक्ष, पीएम मोदींनी अशी दिली साथ

| Updated on: Oct 09, 2023 | 6:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे टांझानियाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवणही केले. यावेळी एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा आहे.

संगीतावर अशा थिरकल्या टांझिनियाच्या राष्ट्राध्यक्ष, पीएम मोदींनी अशी दिली साथ
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया हसन यांची भेट घेतली. हैदराबाद हाऊसमध्ये खास जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर प्रतिनिधी तेथे पोहोचले तेव्हा गाणे ऐकून टांझानियन प्रतिनिधी खूप आनंदी झाले. राष्ट्राध्यक्षांनी स्वत: पुढे येऊन संगीत पथकाला काही भेटवस्तूही दिल्या. यासोबतच टांझानियन प्रतिनिधी त्या गाण्यावर नाचताना दिसले. नंतर जेवणाच्या टेबलावर बसले. यावेळी पीएम नरेंद्र मोदी हे देखील त्यांच्या टेबलावर बसून संगीताचा आनंद घेताना दिसले. काही वेळाने अध्यक्ष सामिया हसन पीएम मोदींच्या शेजारी येऊन बसल्या.

टांझानियामध्ये उघडली जाणार आयआयटी मद्रासची शाखा

टांझानियामध्ये आयआयटी मद्रासची शाखा उघडली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात यावर आनंद व्यक्त केला. झांझिबारमध्ये केंद्र सुरू करण्याची आयआयटी मद्रासची घोषणा हा आमच्या संबंधांसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रात आम्ही पाच वर्षांच्या रोडमॅपवर सहमती दर्शवली आहे. यातून नवे आयाम खुले होतील.

भारत आणि टांझानिया दरम्यान कोणते करार?

भारत आणि टांझानिया यांच्यातील संबंधांमध्ये आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही आमच्या जुन्या मैत्रीला धोरणात्मक भागीदारी बनवत आहोत. भारत आणि टांझानिया हे परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे भागीदार आहेत. यासाठी दोन्ही बाजूने काम करत आहेत. पीएम म्हणाले की स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी आमच्यामध्ये एक करार झाला आहे.

आयसीटी केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण, संरक्षण प्रशिक्षण, ITEC आणि ICCR शिष्यवृत्तींद्वारे टांझानियाच्या कौशल्य विकासात आणि क्षमता वाढीसाठी भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याशिवाय पाणीपुरवठा, कृषी, आरोग्य, शिक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रात आम्ही एकत्र काम करत आहोत. पंतप्रधान म्हणाले की आम्ही टांझानियाच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.