नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीन दिवसांच्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये आयोजित 50 व्या विजय दिवस सोहळ्याला राष्ट्रपती हजेरी लावणार आहेत. राष्ट्रपतींच्या तीन दिवसीय दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या यात्रेदरम्यान द्विपक्षीय संबंधावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींसोबत त्यांची पत्नी, मुलगी तसेच वरिष्ठ अधिकारी दौऱ्यात सहभागी आहेत.
• हजरत शाहजाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
• राष्ट्रपती कोविंद यांना बांग्लादेशच्या तिन्ही सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’
• राष्ट्रीय स्मारकाला भेट, पुष्पचक्र अर्पण
• बांग्लादेशचे जनक शेख रहमान यांच्या स्मारकाला भेट
• बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांसोबत वार्तालाप
• काली मंदिराच्या पुनर्निर्माण कामाचे लोकार्पण
बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद यांनी ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती कोविंद यांचे स्वागत केले. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वागतावेळी बांग्लादेश सैन्याच्या तिन्ही दलाच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. राष्ट्रपतींचा ताफा राजधानी ढाक्याच्या नजीक स्थित राष्ट्रीय स्मारकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. बांग्लादेश मुक्ती संग्रामात धारातीर्थी पडलेल्या शहीदांना पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. बांग्लादेशचे जनक शेख मुजीबुर रहमान यांच्या स्मारकाला भेट देण्याचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या दौऱ्यात समाविष्ट आहेत.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत राष्ट्रपती कोविंद द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या भेटीप्रित्यर्थ आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातही पंतप्रधान शेख हसीना सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेटीच्या प्रित्यर्थ बांग्लादेशच्या राष्ट्रपतींना भेट देणार आहेत.बांग्लादेश युद्धात वापरण्यात आलेले रशिया निर्मित टी-55 टँक आणि मिग- 21 विमानांची प्रतिकृती भेट देणार आहेत.
राष्ट्रपती कार्यालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रपती कोविंद काली मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. राजधानी ढाक्याच्या मध्य भागात स्थित काली मंदिराच्या पुनर्निर्मित कामाचे उद्घाटन व पाहणी राष्ट्रपतींच्या हस्ते केली जाणार आहे.
1971 मध्ये पाकिस्तानविरोधी लढाईतील विजयाचे प्रतीक म्हणून विजय दिवस साजरा केला जातो. भारतीय सैन्याच्या निकराच्या लढाईत पाकिस्तानने आत्मसमर्पण केले होते आणि भारताच्या सहयोगातून बांग्लादेश स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.
इतर बातम्या
Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर, दौऱ्यात कोणती मोठी घोषणा?