पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राहुल गांधी यांचा विरोध; सूचवलं ‘या’ नेत्याचं नाव

| Updated on: May 21, 2023 | 12:37 PM

नवं संसद भवन त्रिकोणी आकाराचं बनलेलं आहे. हे संसद भवन चार मजली इमारतीचं आहे. संसद भवनाचा संपूर्ण परिसर 64500 वर्ग मीटरचा आहे. या संसद भवनाच्या निर्मितीसाठी 862 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राहुल गांधी यांचा विरोध; सूचवलं या नेत्याचं नाव
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : येत्या रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन होणार आहे. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोध केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत हा विरोध केला असून नव्या संसद भवनाचं उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं पाहिजे हे सुद्धा सूचवलं आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून त्यावर भाजपकडून काय उत्तर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी याबाबतची माहिती दिली होती. मात्र, मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणं राहुल गांधी यांना पटलेलं नाही. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे. पंतप्रधानांच्या नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून तशी प्रतिक्रिया दिली आहे.

सावरकर जयंतीलाच का?

या आधी विरोधकांनी सावरकर जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध केला होता. सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधून नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणं हा राष्ट्र निर्मात्यांचा अवमान असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. तर, मोदींनी संसद भवनाचं उद्घाटन का करावं? असा सवाल काही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.

 

10 डिसेंबर 2020मध्ये नव्या संसद भवनाच्या कामाचा शिलान्यास करण्यात आला होता. टाटा प्रोजेक्टने नव्या संसद भवनाचं बांधकाम केलं आहे. तर या इमारतीचं डिझाइन आणि आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केलं आहे. बिमल पटेल हे गुजरातच्या अहमदाबादचे आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक बड्या इमारतींचं डिझाईन केलं आहे.

862 कोटींचा खर्च

नवं संसद भवन त्रिकोणी आकाराचं बनलेलं आहे. हे संसद भवन चार मजली इमारतीचं आहे. संसद भवनाचा संपूर्ण परिसर 64500 वर्ग मीटरचा आहे. या संसद भवनाच्या निर्मितीसाठी 862 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नव्या संसद भवनात एक संविधान हॉल आहे. त्यात लोकशाहीचा वारसा दाखवला जाणार आहे. त्याशिवाय खासदारांसाठी लाऊंज, अनेक कमिटी रूम, डायनिंग एरिआ आणि पार्किंग स्पेसही असणार आहे.

किती सदस्य बसणार?

नव्या संसद भवनात लोकसभेचे 888 आणि राज्यसभेचे 384 सदस्य बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यमान संसद भवनात 550 लोकसभा सदस्य आणि राज्यसभेत 250 सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा हा एक भाग आहे.