इंडिया आघाडीने अखेर शड्डू ठोकला, दिल्लीतल्या बैठकीत मोठा निर्णय, भाजपच्या अडचणी वाढणार?

| Updated on: Sep 13, 2023 | 7:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली.

इंडिया आघाडीने अखेर शड्डू ठोकला, दिल्लीतल्या बैठकीत मोठा निर्णय, भाजपच्या अडचणी वाढणार?
जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील इतर नेतेही या फोटोत आहेत.
Follow us on

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विरोधी पक्षांच्या गोटात तर सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. देशभरातील बहुसंख्य विरोधी पक्षांची आघाडी तयार झालीय. या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव देण्यात आलंय. या आघाडीत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस पक्ष यांच्यासह देशभरातील अनेक पक्षांचा समावेश आहे. या आघाडीची धाकधूक सत्ताधारी पक्षांना देखील वाटायला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या आघाडीच्या गोटात सातत्याने हालचाली घडत आहेत. या आघाडीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीची ताकद प्रत्यक्षात दिसणार आहे.

या पक्षांची आधी पाटणा, नंतर बंगळुरु आणि मुंबईथ मॅरेथॉन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये इंडिया आघाडीची एक समन्वय समिती तयार करण्यात आली. या समितीची पहिली बैठक आज राजधानी दिल्लीत पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.

इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत काय ठरलं?

या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आजच्या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले याविषयी माहिती दिली. “जागा वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु करावी, यावर चर्चा झाली. देशभरात सभा घेण्याचं ठरलं आहे. भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सभा घेतली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेसाठी भोपाळची निवड करण्यात आली आहे”, अशी प्रितिक्रिया के. सी, वेणुगोपाल यांनी दिली. त्यानंतर ही पत्रकार परिषद आटोपली.

भाजपचं टेन्शन वाढणार?

इंडिया आघाडीत सुरु असलेल्या घडामोडींमुळे भाजपचं देखील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कारण इंडिया आघाडीचे नेते आता देशभरात फिरणार आहेत. इंडिआ आघाडीची पहिली सभा ही भोपाळमध्ये घेण्यात येणार आहे. देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ही सभा पार पडणार आहे. या सभांमधून इंडिया आघाडीचे नेते भाजपवर घणाघात करणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी या सभा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.