नवी दिल्ली | 4 डिसेंबर 2023 : पाच राज्यांच्या निकालानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला बंपर यश मिळाले. त्याचे परिणाम संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिसणार आहे. भाजप अधिक आक्रमक होणार असून विरोधकांना दोन पावले मागे घ्यावे लागणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. पराभवानंतर निराश होऊ नका. संसदेत त्याचा राग काढू नका. हा पराभव सुर्वणसंधी समजा. सकारात्मक होऊन बदल करा…असे सल्ले मोदी यांनी दिले.
वर्तमान निकाल पहिल्यास विरोधकांना आपल्यात बदल करण्याची सुवर्णसंधी आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सुरु असलेला प्रकार थांबवा. विकासासाठी एकत्र या. विकसित भारत होण्यासाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. या पराभवाचा राग संसदेत काढू नका. तुम्ही सकारात्मकाता ठेवल्यास देश तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणार आहे. पराभवामुळे तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. प्रत्येकाचे भविष्य उज्ज्वल आहे. परंतु कृपा करुन बाहेरचा राग संसदेत काढू नका. लोकशाहीच्या या मंदिरास कुस्तीचा आखडा बनवू नका. देशाहितासाठी चर्चा करा. चांगल्या कामांना पाठिंबा द्या. कारण लोकशाहीत विरोध पक्ष महत्वाचा आहे.
हिवाळी अधिवेशन काळात १५ बैठका होणार आहेत. अनेक महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. गुड गर्व्हनर्समुळे एन्टी इन्कबन्सी राहत नाही. हा अनुभव सतत येत आहे. चांगल्या जनादेशानंतर आज आम्ही संसदेच्या नवीन मंदिरात भेटत आहोत. यापूर्वी नवीन संसद भवानाच्या उद्घाटनाच्या वेळी आम्ही भेटलो होतो. आता अधिवेशामुळे पूर्ण वेळ नवीन संसद भवनात बसणार आहे.
देशाने नकारात्मकता नाकारली आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. आम्ही सतत विरोधकांबरोबर चर्चा करण्याची तयारी ठेवता. या अधिवेशानापूर्वी विरोधकांशी चर्चा आमच्याकडून करण्यात आली आहे. आम्हाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. लोकशाहीचे हे मंदिर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे. विकसित भारतासाठी हा महत्वाचा मंच आहे. खासदारांनी चांगला अभ्यास करुन विधेयकावर चर्चा करावी. परंतु चर्चाच झाली नाही तर देशाचे नुकसान होते.