पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. त्यात विविध विषयांवर रोखठोक भूमिका मांडली. भाजपमध्ये होत असलेल्या इनकमिंग आणि काँग्रेसमधील आऊटगोइंग संदर्भात त्यांनी उत्तर दिले. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
काँग्रेससंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी सभागृहातही काँग्रेसमध्ये अनेक गट झाले होते. त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चाही करत होतो. काँग्रेसच्या लोकांना चांगला विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पाडावी, असे मी त्यांना सांगायचो. मी राज्याच्या विकासाचे आणि प्रत्येक आमदाराचे काम करायचो. त्यामुळे विरोधकांकडे काम राहिलं नव्हते. ते दिल्लीला खूश ठेवण्यात मग्न झाले होते.
भाजपमध्ये इतर पक्षातून येणाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे, त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, घराणेशाही पक्ष आणि लोकशाहीवादी पक्ष यात फरक असतो. मला माझ्या पक्षाचा विस्तार करायचा आहे. माझ्या ज्या आयडिया आहेत, त्याच्याशी कोणी जोडले जात असेल तर त्यांना आम्ही सोबत घेतो. नवा विचार आणि प्रवाह जर आम्ही येऊ दिला नाही तर आम्हीही संकुचित होऊ शकतो. आम्हाला प्रत्येकवेळी मैदानात राहिलं पाहिजे. एसीत राहिलो असं चालत नाही. भाजप फायदा करेल असं वाटतं. त्यामुळे लोक भाजपात येत आहे. त्यांचे स्वागत आहे. कितीही वाईट माणूस असेल त्याच्याकडेही काही तरी देण्यासारखं असतं. त्यांना आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करतो.
आघाडीसंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आघाडीला निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवू नका. देशात विविधता आहे. आपली फिलॉसॉफी काय आहे. देशातील प्रादेशिक अस्मितेचा सन्मान झाला पाहिजे. तसे नॅशनल पॉलिटिक्स व्हावे. कोणतीही मोठी राजकीय पार्टी असो. त्यांनी प्रादेशिक पक्षाला तेवढंच मोठं स्थान दिलं पाहिजे. आमच्यासोबत कोणी आलं तर त्यांना आम्ही सोबत घेत आहोत. आमच्याकडे बहुमत असतानाही टीडीपी आणि शिवसेना आमच्यासोबत होती. प्रादेशिक पक्षांची लढाई राज्यात असते. त्यांची रणनीती राज्याच्या हिशोबाने होते. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो. आम्हाला राज्याचं भलं हवं असतं. आम्ही काँग्रेससारखा अहंकार ठेवत नाही. आम्ही सर्वांना घेऊन जात असतो.