नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा प्लान तयार करत असाल तर लगेच प्लान तयार करा. कारण आता 9 सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस देशाला मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हर्च्युअली या एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामुळे पर्यटक आणि इतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुपरफास्ट होणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात देशवासियांना मोठी भेट मिळणार आहे. थोड्याच वेळात हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
आधी ज्या वंदे भारत एक्सप्रेस देशाला लोकार्पण करण्यात आल्या होत्या, त्या सर्व 16 डब्ब्यांच्या होत्या. आता या नऊही वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांच्या असणार आहेत. यात केवळ एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि सात इकॉनॉमी चेअर कोच त्यात असणार आहेत. भविष्यात जसा प्रतिसाद मिळेल त्या प्रमाणे कोचची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांचं सांगणं आहे.
आयटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर हैदराबाद आणि बंगळुरू दरम्यान प्रवास करत असतात. सध्या या दोन शहरांदरम्यान तीन नियमित सेवा आहेत. तर काचीगुडा-बंगळुरू-म्हैसूर, काचीगुडा- यालाहंका आणि निजामुद्दीन-बंगळुरू राजधानी एक्सप्रेस नियमितपणे चालते. याशिवाय गरीब रथ एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस, काचीगुडा-यशवंतपूर, जबलपूर-यशवंतपूर, लखनऊ-यशवंतपूर दररोज सुरू आहे. त्याशिवाय वंदे भारत ही चौथी नियमित सेवा सुरू होणार आहे. वंदे एक्सप्रेस ही महबूबनगरहून निघेल. ती तेलंगना, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यातून जाणार आहे.
सध्या हैदराबादहून बंगळुरूच्या दरम्यान चालणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला निर्धारीत स्टेशनवर पोहोचण्यासाठी साडे अकरा तासाची वेळ लागते. यातील केवळ राजधानी एक्सप्रेस ही 10 तास चालते. तर नवी वंदे भारत एक्सप्रेसही फक्त 8 तासात निर्धारित ठिकाणी पोहोचणार आहे.
ही ट्रेन काचीगुडाहून सकाळी 5.30 वाजता निघेल. ती दुपारी 2.15 वाजता बंगळुरूला पोहोचेल. तिथून ती दुपारी 3 वाजता परत निघेल आणि रात्री 11.15 वाजता काचीगुडाला पोहोचेल. आतापर्यंत या एक्सप्रेसचं अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र, ही ट्रेन महबूबनगर, कुरनूल आणि अनंतपूर स्टेशनवर थांबणार आहे. मात्र, आणखी दोन स्थानकांवर ही ट्रेन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
उदयपूर-जयपूर
तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई
हैदराबाद-बंगळुरू
विजयवाड़ा-रेनीगुंटा-चेन्नई
पटना-हावड़ा
कसरगौड़-तिरुवनंतपूरम
राउरकेला-भुवनेश्वर-पुरी
रांची-हावड़ा
जामनगर-अहमदाबाद
या वंदे भारत एक्सप्रेसची चांगली कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे. ही ट्रेन अनेक धार्मिक स्थळं आणि पर्यटनस्थळावरून जाणार आहे. या ट्रेनमधून तिरुपतीलाही जाता येणार आहे. त्यामुळे भक्तांना फायदाच होणार आहे. मदुराईचं मिनाक्षी मंदिर असो की अहमदाबादची मंदिरं आणि पर्यटन स्थळं असो या सर्व ठिकाणी भाविक आणि पर्यटकांना जलदगतीने जाता येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही सध्याच्या घडीला देशात असलेल्या फास्ट पॅसेंजर ट्रेनपैकी एक आहे. या ट्रेनने प्रवास केल्यास दोन ते तीन तासांचा वेळ वाचणार आहे.
आजपासून सेवेत येणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसचा 11 राज्यांना फायदा होणार आहे. राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेशला या ट्रेन्सचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याशिवाय कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातलाही या एक्सप्रेसचा फायदा होणार आहे.