अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी सकाळपासूनच मतदान सुरू झालं आहे. गुजरात निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं होतं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सभांचा धडाका लावला होता. आजही मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातेत आले. यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पायी चालतच मोठ्या भावाच्या घराकडे रवाना झाले. बऱ्याच वर्षानंतर मोदी आपले मोठे बंधू सोमाभाई मोदींना भेटले. एकमेकांना भेटल्यानंतर दोन्ही नेते भावूक झाले होते. यावेळी खूप मेहनत करतोस. थोडा आराम कर, असा सल्ला सोमाभाई यांनी मोदींना वडीलकीच्या नात्याने दिला. हे सांगताना सोमाभाई अत्यंत भावूक झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रानिपच्या निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन मतदान केलं. सकाळी 9 वाजता मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मोदी चालतच आपला भाऊ सोमाभाई मोदी यांच्या घरी गेले. सोमाभाई अत्यंत छोट्या घरात राहत असून साधं जीवन जगत आहेत. यावेळी दोन्ही भावांनी एकमेकांची विचारपूस केली.
सोमाभाई मोदी यांनीही अहमदाबादमध्ये मतदान केलं. मतदान केल्यानंतर सोमाभाई यांनी मीडियाशी संवाद साधला आणि मोदींसोबतच्या भेटीची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना सोमाभाई भावूक झाले. त्यांचा कंठ दाटून आला होता.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं, तुम्ही देशासाठी खूप कष्ट उपसत आहात. थोडा आरामही करा. भाऊ म्हणून मी त्यांना एवढंच सांगू शकतो. त्यांना प्रचंड मेहनत घेताना पाहून समाधान वाटतं, असं सोमाभाई यांनी सांगितलं.
#WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के भाई सोमा भाई मोदी उनके बारे में बात करते हुए भावुक हुए। pic.twitter.com/7nKhnguxy1
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2022
तुम्ही तुमच्या मताचा योग्य वापर करा. देशाची प्रगती साधू शकणाऱ्या पक्षालाच मतदान करून निवडून आणा, असं आवाहन मी मतदारांना करेल. 2014 पासून आतापर्यंत जी विकासाची कामे झाली आहेत. ही कामे लोक डोळ्याआड करू शकत नाहीत. त्याच आधारावर मतदान होत आहे, असंही सोमाभाई यांनी सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनीही मतदानाचा हक्क बजावला. हिराबेन या 100 वर्षाच्या आहेत. त्यांनी गांधीनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुलगा जय शाह आणि कुटुंबासोबत अहमदाबादच्या नारणपुरा येथे मतदानाचा हक्क बजावला. गुजरातमध्ये आज 14 जिल्ह्यातील 93 जागांवर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.